Join us

राज ठाकरे अन् फडणवीसांची मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट?; महायुती अन् 'इलेक्शन पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 08:31 IST

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे.

मुंबई - राज्यातील ४८ जागांसाठी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी लवकरच अधिसूचना जारी होत असून पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे, राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर आता लवकरच राज ठाकरेंकडून घोषणा होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला महत्त्वाची माहिती दिली. महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. मतदारसंघातील उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर, राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटीवरून मनसे महायुतीत सहभागी होत असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सूचक विधान केले होते. अमित शाह यांच्याशी त्यांची भेट झाली आहे. या गोष्टी अतिशय प्राथमिक पातळीवर आहेत. यावर आता काही बोलण्यापेक्षा एक ते दोन दिवस वाट पाहावी. म्हणजे सगळ्या गोष्टी नीट आणि सविस्तर पद्धतीने सांगू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, आता दोन नेत्यांमध्ये मुंबईत भेट झाल्याचे समजते.  

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस रात्री ११ वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. तर, त्याच वेळेत राज ठाकरे हे शिवतीर्थ बंगल्यातून बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं असून दोन्ही नेत्यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याचे समजते. विशेष म्हणजे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा असून या मेळाव्यापूर्वी राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने आजच्या मेळाव्यातच पदाधिकाऱ्यांपुढे राज ठाकरे आपली भूमिका मांडतील, असे दिसून येते. 

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला मनसे पदाधिकाऱ्याचं समर्थन मिळावं, तसेच आपली भूमिका सर्वांना पटवून देता यावी, यासाठी अंतिम निर्णय पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यापूर्वी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आणि महायुतीतील मनसेच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात असून आजच महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे १० जागांवरील उमेदवार निश्चित झाले असून आजच ही यादी माध्यमांमध्ये प्रसारीत केली जाऊ शकते. दुसरीकडे महायुतीमधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीही यादी अंतिम झाली असून त्यातील नावांचीही लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाराज ठाकरेमनसेनिवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४