पावसाचा अंदाजाला चकवा; मुंबईकर घामाने ओलेचिंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:44 IST2025-05-24T10:44:12+5:302025-05-24T10:44:12+5:30

मुंबई, ठाणे, पालघरलाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

rains defy forecast mumbaikars drenched in sweat | पावसाचा अंदाजाला चकवा; मुंबईकर घामाने ओलेचिंब

पावसाचा अंदाजाला चकवा; मुंबईकर घामाने ओलेचिंब

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघरलाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

बुधवार, गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांना पुन्हा चकवा दिला. उलटपक्षी शुक्रवारी मुंबईकरांना वाढत्या ऊकाड्याने अधिक बेजार केले. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत हवामानातील बदलामुळे मुंबईकर घामाघूम झाले. दुसरीकडे मुंबई वगळता राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा मारा अधून-मधून सुरूच होता. 

महाबळेश्वर शहराच्या १२२ वर्षांच्या इतिहासातील मे महिन्यातील दुसरी सर्वांत मोठ्या पावसाची नोंद शुक्रवारी ९८ मिमी एवढी नोंदवण्यात आली. यापूर्वी २५ मे १९०३ रोजी महाबळेश्वर येथे २१७.४ मिमी पावसाची नोंद झाली होती, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.

दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये   

पुढील ४८ तासांत नैर्ऋत्य मौसमी वारे (मान्सून) केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही भाग, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू तसेच दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा चार ते पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुढील चार दिवसांत कोकण व गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकताे.

 

Web Title: rains defy forecast mumbaikars drenched in sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.