राज्यात पाऊस, मुंबईकर घामाघूम, पुण्यात सर्वाधिक ३१ मिमि पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 05:53 IST2019-11-06T05:53:04+5:302019-11-06T05:53:23+5:30
पुण्यात सर्वाधिक ३१ मिलीमीटर पावसाची नोंद; ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळांमुळे वातावरणात बदल

राज्यात पाऊस, मुंबईकर घामाघूम, पुण्यात सर्वाधिक ३१ मिमि पाऊस
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून, राज्यात मुख्यत: हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २४ तासांत पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईलाही पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, मुंबईत पाऊस पडला नाही. उलट उकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
पुण्यात १९ आॅक्टोबरपासून पाऊस सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात पुण्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. सरासरी ३०.१ मिमीच्या तुलनेत पहिल्या चार दिवसांतच ८५ मिमी इतका पाऊस पडला आहे. गेल्या ४८ तासांत शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. २१ तासांच्या कालावधीत ३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ‘क्यार’, ‘महा’ या चक्रीवादळांमुळे पाऊस पडत असल्याचे स्कायमेटने सांगितले. मुंबई शहर, उपनगराचा विचार करता सोमवारप्रमाणेच मंगळवारीही हवामान कोरडे होते. पावसाचा इशारा असतानाही मुंबईत उन पडले होते. मंगळवारी दुपारच्या तापदायक किरणांसह उकाड्याने मुंबईकर घामाघूम झाल्याचे चित्र होते.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात, विदर्भाच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत तर विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास होते.