मुंबई शहर आणि उपनगरांत संततधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 07:06 IST2018-08-07T06:22:41+5:302018-08-07T07:06:25+5:30
शनिवारी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या होत्या.

मुंबई शहर आणि उपनगरांत संततधार पावसाचा इशारा
मुंबई : शनिवारी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या होत्या. रविवारी मात्र दुपारी चारदरम्यान पडलेली तुरळक सर वगळता पावसाने रजा घेतली. सोमवारही कोरडाच गेला असून, मुंबईसह उपनगरात केवळ ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे. वातावरणात बदल नोंदविण्यात येत असतानाच आता मंगळवारपासून चार दिवस मुंबईत तुरळक सरी कोसळतील. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्येही अशीच स्थिती असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ ते १० आॅगस्टदरम्यान उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल; उत्तर कोकणात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. ८ ते १० आॅगस्टदरम्यान दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
७ आणि ८ आॅगस्ट रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ७ आणि ८ आॅगस्टदरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.