उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट; पार्कात सर्वत्र चिखल-पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:56 IST2025-10-01T10:55:36+5:302025-10-01T10:56:14+5:30
शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धवसेनेतर्फे भव्य स्टेज उभारणीचे काम वेगाने सुरू असले तरी सततच्या पावसामुळे मैदानात सर्वत्र चिखल व पाणी साचले आहे.

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट; पार्कात सर्वत्र चिखल-पाणी
मुंबई : शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धवसेनेतर्फे भव्य स्टेज उभारणीचे काम वेगाने सुरू असले तरी सततच्या पावसामुळे मैदानात सर्वत्र चिखल व पाणी साचले आहे. मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे तळे निर्माण झाल्याने शिवसैनिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि उद्धवसेना आगामी निवडणुका एकत्र लढवू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भव्य शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे; पण मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक असताना पावसाने जोर धरल्याने अडचणी वाढल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी महापालिकेने मैदानातील वाढलेले गवत कापून साचलेले पाणी उपसले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा झालेल्या पावसामुळे येथे पाणी साचल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. येथे ठेवलेल्या खुर्च्यांवरही चिखलाचा थर पसरला आहे.