Rain and thunderstorms will collapse in Mumbai today and tomorrow; Forecast of the Meteorological Department | आज अन् उद्या मुंबईत पावसाच्या तुरळक सरी कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज
आज अन् उद्या मुंबईत पावसाच्या तुरळक सरी कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी पावसाने उसंत घेतली असून, बुधवारसह गुरुवारी मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच पश्चिम किनारपट्टी, कोकण परिसरात गणेश विसर्जनादिवशी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी अंधेरीत घराच्या छताचा भाग कोसळून ३ जण जखमी झाल्याची घटना घडली.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत कोसळत असलेल्या पावसाने मंगळवारी बऱ्यापैकी विश्रांती घेतली. सकाळी शहरासह उपनगरात किंचित सरी कोसळत असतानाच सकाळी ११नंतर मात्र ठिकठिकाणी ऊन पडले. तर कुठे ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. ज्या उपनगराला पावसाने झोडपले त्या उपनगरात मंगळवारी बºयापैकी पावसाने विश्रांती घेतली आणि ऊन पडल्याने उपनगरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. मधल्या काळात ठिकठिकाणी दाटून येत असलेल्या काळ्याकुट्ट ढगांमुळे जोरदार पाऊस पडेल, असे वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र किंचित सरी कोसळत होत्या. हवामानात हे बदल नोंदविण्यात येत असतानाच १७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ३ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

दरम्यान, रविवारी सकाळी अंधेरी पश्चिमेकडील आरेन निवास इमारतीमधील घराच्या छताचा भाग कोसळून ३ व्यक्ती जखमी झाल्या. कूपर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, पूनम पोद्दार, वर्षा पोद्दार आणि गीता पोद्दार अशी त्यांची नावे आहेत.

आज कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार

  • गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगतची द्रोणीय स्थिती विरून गेली आहे.
  • ११ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
  • १२ सप्टेंबर रोजी गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
  • १३ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल.
  • १४ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल.
Web Title: Rain and thunderstorms will collapse in Mumbai today and tomorrow; Forecast of the Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.