रेल्वेचे यूटीएस ॲप बंद, प्रवाशांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:25 IST2025-01-15T06:25:40+5:302025-01-15T06:25:58+5:30
ट्रेनमधून उतरल्यावर टीसीला मोबाइलमधील मासिक पास आणि तिकीट दाखवताना अडचण येत असल्याने काही प्रवाशांचे टीसीसोबत वाद झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

रेल्वेचे यूटीएस ॲप बंद, प्रवाशांची उडाली तारांबळ
मुंबई : भारतीय रेल्वेचे अनारक्षित तिकीट सेवा (यूटीएस) मोबाइल ॲप मंगळवारी संध्याकाळी बंद झाले हाेते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट लोकलचे बुक करताना प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच ट्रेनमधून उतरल्यावर टीसीला मोबाइलमधील मासिक पास आणि तिकीट दाखवताना अडचण येत असल्याने काही प्रवाशांचे टीसीसोबत वाद झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपचे सुमारे १.४ कोटी वापरकर्ते असल्याने त्यांना याचा त्रास सहन करावा लागला. या ॲपमध्ये फॅसिलिटी ॲक्सेस एरर (एफएसी) येत असून, सेवा तात्पुरती उपलब्ध नसल्याचा मेसेज येत होता. ऐन गर्दीच्या वेळी हे ॲप बंद पडल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली. तसेच ॲपच्या माध्यमातून तिकीट काढता येत नसल्याने प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर ताटकळत उभे राहावे लागले. तसेच तिकीट दाखवता न आल्याने प्रवाशांचे टीसीसोबत वाद झाले.