‘एमयूटीपी’ला रेल्वेचे १७७७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:14 IST2025-05-18T13:14:32+5:302025-05-18T13:14:40+5:30

यामुळे एकूण निधीचा पुरवठा दुप्पट होऊन या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी वेगाने सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील, असा दावा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनने केला आहे...

Railways to provide Rs 1777 crore to MUTP | ‘एमयूटीपी’ला रेल्वेचे १७७७ कोटी

‘एमयूटीपी’ला रेल्वेचे १७७७ कोटी

मुंबई : मुंबई महानगर (एमएमआर) क्षेत्रात महत्त्वाचा असलेल्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टला (एमयूटीपी) रेल्वे मंत्रालयाने २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात १७७७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मागील वर्षीच्या ७८९ कोटींच्या तुलनेत यंदा हा निधी १२५ टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, राज्य शासनही तितकीच रक्कम त्यासाठी देणार आहे. यामुळे एकूण निधीचा पुरवठा दुप्पट होऊन या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी वेगाने सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील, असा दावा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनने केला आहे.

एमयुटीपी - १ मध्ये नऊवरून बारा डब्यांच्या उपनगरीय गाड्या सुरू करण्यात यापूर्वीच यश आले आहे. त्यातून बोरिवली-विरार आणि कुर्ला-ठाणे या जादा मार्गिकाही सुरू करण्यात आल्या आहेत. एमयूटीपी-२ मध्ये सर्व डीसी गाड्यांचे एसीमध्ये परिवर्तन करण्याचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. ठाणे-दिवा दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका सुरू झाली आहे, त्याचप्रमाणे या टप्प्यात सीएसएमटी-कुर्ला मार्गावर पाचवी, सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल-बोरीवली सहाव्या मार्गिकेचे काम वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. एमयुटीपी-३ मध्ये पनवेल-कर्जत हा प्रकल्प, ऐरोली-कळवा हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या टप्प्यात बोरीवली-विरार, गोरेगाव-बोरीवली हार्बर लाइन, कल्याण-बदलापूर, कल्याण-आसनगावदरम्यान विस्ताराची कामेही नियोजित आहेत.

अतिरिक्त निधीची गरजेनुसार उपलब्धता
मागील आर्थिक वर्षातही निधीच्या कमतरतेचा कोणताही अडथळा एमयूटीपीमध्ये आला नाही. या प्रकल्पातील कामांमध्ये कोणतीही अडचण न येता ते सुरळीत सुरू राहिले. कामकाजाच्या प्रगतीनुसार गरज भासल्यास सुधारित अर्थसंकल्पातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

आर्थिक पाठबळामुळे नवीन कॉरिडॉरसह सुधारित रेल्वे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने प्रगती करत आहे. यामुळे मुंबईतील प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित उपनगरीय रेल्वे नेटवर्क उपलब्ध होईल.
विलास वाडेकर, अध्यक्ष, मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन 

Web Title: Railways to provide Rs 1777 crore to MUTP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे