रेल्वे तिकीट कॅन्सलेशन पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:01 IST2025-04-12T11:01:20+5:302025-04-12T11:01:35+5:30

Crime News: रेल्वेचे तिकीट रद्द करताना कस्टमर केअरमधील तोतया व्यक्तीने पाठवलेली फाइल डाऊनलोड केल्याने गृहिणीच्या खात्यातून दोन लाख दोन हजार ९८ रुपये चोरण्यात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Railway ticket cancellations become costly | रेल्वे तिकीट कॅन्सलेशन पडले महागात

रेल्वे तिकीट कॅन्सलेशन पडले महागात

 मुंबई -  रेल्वेचे तिकीट रद्द करताना कस्टमर केअरमधील तोतया व्यक्तीने पाठवलेली फाइल डाऊनलोड केल्याने गृहिणीच्या खात्यातून दोन लाख दोन हजार ९८ रुपये चोरण्यात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वंदना भाटिया (रा. न्यू म्हाडा टॉवर, अंधेरी पश्चिम) यांनी २६ जानेवारीचे मुंबई-अहमदाबाद ट्रेनचे तिकीट ॲपवरून काढले. मात्र, अहमदाबादला जाणे रद्द झाल्याने त्यांनी २६ जानेवारीला सकाळी ७ वाजता संबंधित ॲपद्वारे तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे तिकीट रद्द झाले नाही. मात्र, अर्ध्या तासाने त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करत आपण रेल्वेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले.

ओटीपी शेअर करण्यास तक्रारदाराचा नकार
तिकीट रद्द करून पैसे परत हवे असल्यास मी पाठवलेली ‘कॅन्सल डॉट एपीके’ फाइल डाऊनलोड करून माहिती भरा, असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. भाटिया यांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाइल क्रमांक भरला. मात्र, ओटीपी शेअर करण्यास नकार देताच त्यांना चार शून्य टाइप करा, असे तो म्हणाला. 

...तरीही दोन लाख वळते
भाटिया यांनी तसे करताच त्यांच्या बँक खात्यातून २० हजार रुपये काढले गेले. भाटिया यांनी याबाबतची माहिती त्यांच्या बँकेच्या कस्टमर केअरला देत व्यवहार थांबविण्यास सांगितले. 
दहा मिनिटांनी पुन्हा त्यांनी बँक खाते तपासले असता, त्यातून एक लाख ५२ हजार ९८ रुपये, तर क्रेडिट कार्डमधून ५० हजार रुपये, असे एकूण दोन लाख दोन हजार ९८ रुपये डेबिट झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), (ड) तसेच बीएनएस कायद्याचे कलम ३१८ (४) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

Web Title: Railway ticket cancellations become costly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.