ओटीपी पाठवत रेल्वे टीसीचे बँक खाते रिकामे; ८२ हजारांची फसवणूक; जोगेश्वरी पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:12 IST2025-12-25T10:11:59+5:302025-12-25T10:12:14+5:30
जोगेश्वरी पूर्वेला कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या के. सूरजकांता जोईचंद्र सिंग यांना २१ डिसेंबर रोजी सायबर भामट्यांनी मोबाइलद्वारे १० ओटीपी संदेश पाठवले.

ओटीपी पाठवत रेल्वे टीसीचे बँक खाते रिकामे; ८२ हजारांची फसवणूक; जोगेश्वरी पोलिसांत गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस असलेले के. सूरजकांता जोईचंद्र सिंग (४१) यांची ८२ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. त्यांनी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात २२ डिसेंबर रोजी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जोगेश्वरी पूर्वेला कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या के. सूरजकांता जोईचंद्र सिंग यांना २१ डिसेंबर रोजी सायबर भामट्यांनी मोबाइलद्वारे १० ओटीपी संदेश पाठवले. हे फसवणुकीचे संदेश असावेत, असा संशय आल्याने त्यांनी ते संदेश डिलीट केले. त्याच दिवशी सायंकाळी ५.२५ वाजता भाजी खरेदीदरम्यान गुगल पेने पेमेंट करताना खात्यात रक्कम शिल्लक नसल्याचा संदेश आल्याने त्यांनी खात्याचा तपशील तपासला.
दरम्यान, त्यांना दुपारी ४.१९ वाजता ५० हजार रुपये आणि ४.२४ वाजता ३२ हजार असे एकूण ८२ हजार रुपये खात्यातून डेबिट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय, मोबाइलवरील संदेश अनोळखी क्रमांकावरून स्वतःलाच परत येत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मोबाइल हॅक झाल्याचा संशय बळावला. तत्काळ त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून खाते तात्पुरते बंद करून घेतले आणि सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांचा तपास सुरू आहे.