रेल्वे स्मार्ट कार्डधारकांना ४ कोटी रुपयांचा बोनस, प्रवाशांनी ३९.९२ कोटींचे केले रिचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:06 IST2025-03-18T12:05:26+5:302025-03-18T12:06:40+5:30
उपनगरीय मार्गावर प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने ११ महिन्यांत ४ कोटी रुपयांहून अधिक बोनस दिला आहे.

रेल्वे स्मार्ट कार्डधारकांना ४ कोटी रुपयांचा बोनस, प्रवाशांनी ३९.९२ कोटींचे केले रिचार्ज
उपनगरीय मार्गावर प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने ११ महिन्यांत ४ कोटी रुपयांहून अधिक बोनस दिला आहे. स्मार्ट कार्ड रिजार्च केल्यावर रेल्वेकडून कार्डधारकांना ३ टक्के बोनस देण्यात येतो. त्यानुसार एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या स्मार्ट कार्डधारकांना १ कोटी १९ लाख ९८ हजार २८२ रुपये, मध्य रेल्वेने २ कोटी ८७ लाख ८६ हजार ५३७ रुपये वितरीत केले आहेत.
प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी रेल्वेने प्रवाशांना स्मार्ट कार्डद्वारे एटीव्हीएमवर तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या कार्डवर रिचार्ज करुन प्रवासी तिकीट काढू शकतात. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत स्मार्ट काडद्वारे एकूण ३९ कोटी ९२ लाख ७१ हजार ७१० रुपयांचे रिचार्ज केले आहेत. याच कालावधीत मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी एकूण ९५ कोटी ८५ लाख १७ हजार ४३० रुपयांचा रिचार्ज केला आहे.
प्रवाशांनो, असे खरेदी करू शकता रेल्वे स्मार्ट कार्ड
१. मुंबई उपनगरासह कोणत्याही उपनगरी स्थानकावरील प्रवासी ऑनलाइन किंवा तिकीट बुकिंग काउंटरवरुन स्मार्टकार्ड खरेदी आणि रिचार्ज करू शकतात.
२. स्मार्ट कार्ड खरेदीसाठी प्रवाशाला त्याचे नाव, आडनाव, पत्ता, ई-मेल आणि संपर्क क्रमांक रेल्वेला द्यावा लागतो. सध्या स्मार्ट कार्ड मिळवण्यापूर्वी प्रथम १०० रुपयांचे रिचार्ज करावे लागते.
३. रिचार्ज केल्यावर स्मार्ट कार्डमध्ये ५० रुपये शिल्लक राहतात आणि ५० रुपये रेल्वेकडे ठेव रक्कम म्हणून जमा केले जातात.
असे केले स्मार्ट रिचार्ज
मध्य रेल्वे- एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५
स्मार्ट कार्ड रिचार्ज- ९५ कोटी ८५ लाख १७ हजार ४३० रुपये
बोनसची रक्कम- २ कोटी ८७ लाख ८६ हजार ५६७ रुपये
पश्चिम रेल्वे- एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५
स्मार्ट कार्ड रिचार्ज- ३९ कोटी ९२ लाख ७१ हजार ७१० रुपये
बोनसची रक्कम- १ कोटी १९ लाख ९८ हजार २८२ रुपये