चूक रेल्वे प्रशासनाची, भुर्दंड मात्र प्रवाशांना; वेटिंग तिकीट मर्यादा २५ टक्के; बुक मात्र १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:18 IST2025-06-29T09:17:44+5:302025-06-29T09:18:29+5:30

रेल्वेगाड्यांच्या १ जुलैनंतर आरक्षित होणाऱ्या वेटिंग तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनाने मर्यादा लागू केली आहे. गाडीतील एकूण आसनक्षमतेपेक्षा केवळ २५ टक्केच वेटिंग तिकिटविक्रीचे प्रशासनाने निश्चित केले.

Railway administration's mistake, but passengers are disappointed; Waiting ticket limit 25 percent; Booked ticket 100 percent | चूक रेल्वे प्रशासनाची, भुर्दंड मात्र प्रवाशांना; वेटिंग तिकीट मर्यादा २५ टक्के; बुक मात्र १०० टक्के

चूक रेल्वे प्रशासनाची, भुर्दंड मात्र प्रवाशांना; वेटिंग तिकीट मर्यादा २५ टक्के; बुक मात्र १०० टक्के

महेश कोले

मुंबई :रेल्वेगाड्यांच्या १ जुलैनंतर आरक्षित होणाऱ्या वेटिंग तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनाने मर्यादा लागू केली आहे. गाडीतील एकूण आसनक्षमतेपेक्षा केवळ २५ टक्केच वेटिंग तिकिटविक्रीचे प्रशासनाने निश्चित केले.   प्रवाशांना मात्र त्यापेक्षा किती तरी जास्त वेटिंग तिकिटे मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली लूट होत आहे. सिस्टीममधील त्रुटीमुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी रेल्वेचे तिकीट मिळवणे  आव्हानच आहे. मध्य मार्गावरील अनेक गाड्यांची एक हजारपेक्षा जास्त वेटिंग तिकिटे मिळत आहेत. २५ टक्के मर्यादेच्या  निर्णयानंतरही आयआरसीटीसी ॲपवरून इतकी वेटिंग तिकिटे कशी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

काहींना कन्फर्म, तर काहींना वेटिंग

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात आयआरसीटीसी ॲपवर एकाच वेळी हजारो वापरकर्ते तिकीट बुक करतात. त्या वेळी केवळ काही मिलिसेकंदांच्या फरकामुळे काहींना कन्फर्म, तर काहींना वेटिंग तिकिटे मिळतात.

अधिकृत वेटिंगची २५ टक्क्यांची मर्यादा असली तरी त्या पलीकडील वेटिंग तिकिटे ‘कन्फर्म’ होण्याची शक्यता नसते. अशा प्रवाशांना प्रोसेसिंग शुल्कवजा करून बाकीची रक्कम परत केली जाते.

मात्र, जर चूक प्रणालीची असेल, तर त्याची किंमत प्रवाशांनी का मोजावी, असा मुद्दा आता जोर धरू लागला आहे.

काही मिलिसेकंदाच्या फरकाने तिकिटे बुक होत असल्यामुळे विहित २५ टक्के मर्यादेपेक्षा जास्त वेटिंग लिस्ट तिकिटे दिली जात आहेत. त्यावर त्यावेळीच बंधन घालणे शक्य नसले तरी रेल्वेने त्यात नंतर सुधारणा करून एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वेटिंग लिस्ट तिकिटे रद्द  करून प्रवाशांना पूर्ण रकमेचा परतावा द्यावा.

अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र

नेमकी त्रुटी काय आहे ?

तिकिटींग सिस्टीममध्ये नेमकी त्रुटी काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी रेल्वेला तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स (क्रिस) संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सत्यकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, या विषयावर बोलण्यासाठी मी योग्य अधिकारी नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात मध्य रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर धनंजय नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Railway administration's mistake, but passengers are disappointed; Waiting ticket limit 25 percent; Booked ticket 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे