Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 07:59 IST

६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबई, केरळमध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मिठी नदीच्या सफाई कामातील ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी मुंबई आणि केरळमध्ये १५ ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, महापालिकेचा सहायक अभियंता प्रशांत रामगुडे आणि काही कंत्राटदारांची निवासस्थाने आणि कार्यालयांचा समावेश आहे. छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांची काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यातून नेमका गैरव्यवहार कसा झाला आणि पैशांची देवाणघेवाण कशी झाली, याचा तपास केला जाणार आहे.

मिठी नदीच्या सफाईचे काम २००७ ते २०२१ या कालावधीत होणार होते. त्याचे कंत्राटही दिले. मात्र, काम प्रत्यक्षात झालेच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि एका खासगी कंपनीचे दोन कर्मचारी अशा १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने तपास सुरू केला आहे. अभिनेता डिनो मोरिया याचीदेखील याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोन वेळा चौकशी केली होती. 

कंत्राट संशयास्पद

मिठी सफाईसाठी जे मशीन मागवण्यात येणार होते त्याचे कंत्राट फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना लाभ देता यावा अशा पद्धतीने मांडण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा तपास होणार आहे.

काय आहे प्रकरण?

१८ किलोमीटर लांबीच्या मिठी नदीच्या सफाईचे ११०० कोटी रुपयांचे कंत्राट काढण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महापालिकेतील सहायक अभियंता, उप-मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कंत्राट आणि त्यातील आर्थिक घडामोडी आदी गोष्टींचा तपासदेखील आता ईडीचे अधिकारी करणार आहेत.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयडिनो मोरियाधाड