Join us  

सावरकरांवरील विधानामुळे महाविकास आघाडीला फटका? अजित पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 12:39 PM

मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकल्याची टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरुन काँग्रेस अन् शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आहे. भाजपाकडून या शीतयुद्धाचा पुरेपूर उपयोग करुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस विचारांना विरोध करणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याच काम भाजपा नेत्यांकडून सुरु आहे. राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, आशिश शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. याबाबत, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मत व्यक्त केले. 

मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकल्याची टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन काँग्रेसवर तर आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. "नाही धार 'सच्चाई'कारांच्या शब्दांना आज दिसली, 'रोखठोक'लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली. सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली. मराठी बाणा सांगणारी सेना, सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!", असे ट्विट करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. भाजपाकडून होणाऱ्या या हल्ल्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सावरकरांवरील विधानाबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीत फूट पडण्यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून वाट पाहत आहेत. पण, शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोठे जाणकार आणि प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे, ते योग्यपणे आपली भूमिका घेतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सावरकर यांच्यावरील विधानावरुन शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन ट्विट करुन राहुल गांधींना सूचक इशारा दिला. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,' असं संजय राऊत यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. 

टॅग्स :अजित पवारशिवसेनाकाँग्रेससंजय राऊतराहुल गांधी