Rahul Gandhi in Mumbai: विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (६ मार्च) दुपारी त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुंबईतील दौऱ्यात राहुल गांधी पक्ष संघटनेला बळकटी, मुंबई महापालिका निवडणूक याबद्दल नेते, काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. मुंबईत आल्यानंतर राहुल गांधी यांनी धारावीतील काही भागांना भेट दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. दुसरीकडे १० मार्चपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, त्यात धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अदानीचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
धारावी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळालेले आहे. हा प्रकल्प अदानी समूहाकडे देण्यासह इतर काही मुद्द्यांवर काँग्रेसने सुरूवातीपासून आक्षेप घेतलेला असून, विरोध करत आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात धारावीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांचे गुरुवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर त्यांनी धारावीतील काही भागात दौरा केला.
धारावीत लघु उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर ज्या ठिकाणी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे, त्यालाही भेट दिली.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील पक्ष संघटनेबद्दल राहुल गांधी नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याबद्दल, पक्ष संघटना बळकट करण्याबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा होणार करणार असल्याचे समजते. त्यानंतर राहुल गांधी अहमदाबादला जाणार आहेत.