काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत महाराष्ट्रातील मतदार वाढीवरुन भाजपावर टीका केली. 'महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके ५ वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या ५ महिन्यात जोडले गेले. शिर्डीच्या एका इमारतीत ७ हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसते, असा आरोप गांधी यांनी केला'. या आरोपावर आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.
शिर्डीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार; राहुल गांधींचा निकालावरून लोकसभेत गंभीर दावा
खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपा आमदार शेलार म्हणाले, मतदार वाढले तर चूक काय? मतदार वाढले त्यामुळे यांच्या पोटात का दुखतंय ? लोकसभेच्यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर नावे गायब झाली म्हणून मतदार ओरड करताना दिसत होते.राहुल गांधी तुम्ही मतदारांची नावे गाळून लोकसभेत विजय मिळवला होतात का?, असा सवालही शेलार यांनी केला.
"राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. या देशातील यंत्रणा, व्यवस्थांबद्दल अनास्था निर्माण करणे हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे. त्याचे तुम्ही प्रवक्ते का बनताय? राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत, अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी केली.
शेलार म्हणाले, जे मतदार विधानसभेला वाढले, त्यांचीच नावे गायब करून तुम्ही लोकसभेच्या निवडणूकीत जिंकला होतात का ? हाच राहुल गांधी यांना आमचा सवाल आहे. उद्धव ठाकरे यांचा जीव हा मुंबई महापालिकेत ब्लॅक लिस्ट झालेल्या कंत्राटदारांमध्ये आणि कटकमिशन मध्ये अडकलाय. रामदासभाई खरे बोलले जर विरोधी पक्षनेते पद द्यायचेच झाले तर वडेट्टीवार यांनी सांगावे तुमच्यात एकमत आहे का?, असंही शेलार म्हणाले.