Rahul and Priyanka's efforts will be successful; Shivsena appreciated | राहुल आणि प्रियंकाची मेहनत यशस्वी होईल; शिवसेनेने केले कौतुक 
राहुल आणि प्रियंकाची मेहनत यशस्वी होईल; शिवसेनेने केले कौतुक 

मुंबई - राहुल गांधीप्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल हेसुद्धा राहुल गांधी यांचे यशच मानावे लागेल असा टोमणा सामना संपादकीयमधून काँग्रेसला लगावण्यात आला आहे. 

राष्ट्रीय पातळीवरील ‘एक्झिट पोल’मधून देशाचा कौल स्पष्ट होत आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने हा ‘कौल’ नाकारला आहे. 23 लाच काय ते बघू असे सांगितले. त्यांचे म्हणणेदेखील खरे आहे. 23 तारखेस ‘ईव्हीएम’ची कुलपे उघडली जातील व दुपारपर्यंत कोण उसळले, कोण आपटले याचा फैसला होईल. तोपर्यंत जो तो ‘आम्हीच येणार, आमच्याशिवाय आहेच कोण?’ असा दावा करायला मोकळा आहे. नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत व काँग्रेस पक्षासह त्यांची आघाडी कुचकामी ठरणार आहे असं खात्रीने सांगतो असं शिवसेनेने म्हटलं आहे. 

सामना संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्दे 
मतदानाच्या सर्व फेऱया संपल्यानंतर जे कल आले आहेत ते पुन्हा एकदा मोदी सरकारच्या बाजूने आहेत. मोदी सरकार पुन्हा येत आहे याचा अंदाज येताच शेअर बाजारही उसळला आहे. सट्टाबाजारही म्हणे तेजीत आला आहे. 

देशाचे भविष्य आणि वर्तमान सुरक्षित राखण्यासाठीच देशाने मोदी यांना मतदान केले आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एक्झिट पोलचे अंदाज साफ फेटाळून लावले. या मतदानोत्तर चाचण्या वगैरे बकवास आहे. या आकडय़ांवर विश्वास ठेवता येत नाही. जगभरात अशा चाचण्या फेल गेल्याचे उपराष्ट्रपती नायडू यांनी सांगितले. 

1999 पासून हिंदुस्थानात जाहीर झालेले एक्झिट पोल चुकीचे ठरत गेले आहेत. 23 मे रोजी जाहीर होणारे निकाल वेगळे असू शकतात. प्रत्येकच पक्षाला आपणच जिंकू अशी आशा असते, पण या विश्वासाला काही आधार नसतो, असेही व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. 

ज्या विविध चाचण्यांचे आकडे आले त्या सर्वांचा ‘सूर’ आणि ‘कल’ एकच आहे. तो म्हणजे केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येत आहे. एनडीएला किमान 350 जागा मिळत आहेत व काँग्रेस शंभरचा टप्पा पार करताना दिसत नाही. 

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व मध्य प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यांत भाजपप्रणीत एनडीएची घोडदौड स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपास ऐतिहासिक विजय मिळेल. आम्ही मतदानानंतरच्या चाचण्यांवर जाऊ इच्छित नाही, तर लोकांचा जो उत्साह आम्ही पाहिला त्यानंतर महाराष्ट्राचा कल आणि कौल स्पष्टच झाला होता. 

2019 साली पुन्हा एकदा मोदींचेच सरकार येईल हे सांगण्यासाठी कुणा पंडिताची गरज नव्हतीच. यंदाची निवडणूक लोकांनीच जणू हातात घेतली व मोदी यांना भरभरून मतदान केले. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढसारख्या राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत. त्या राज्यांतील चाचण्यांतही मोदी यांनाच आघाडी मिळत आहे.  
 


Web Title: Rahul and Priyanka's efforts will be successful; Shivsena appreciated
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.