Mumbai: बेशिस्त चालकांना ‘रडार’मुळे लगाम; लांबूनच नंबर टिपून चालान पाठवणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:33 IST2026-02-04T15:29:37+5:302026-02-04T15:33:01+5:30
मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) ताफ्यात अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेली इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांद्वारे १०० मीटर परिसरातील वाहनांचा वेग, लेन बदल, ओव्हरस्पीडिंगसारख्या नियम भागांवर कारवाई सुरू केली आहे.

Mumbai: बेशिस्त चालकांना ‘रडार’मुळे लगाम; लांबूनच नंबर टिपून चालान पाठवणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) ताफ्यात अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेली इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांद्वारे १०० मीटर परिसरातील वाहनांचा वेग, लेन बदल, ओव्हरस्पीडिंगसारख्या नियम भागांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नियम मोडणाऱ्या हजारांपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा मजबूत करत वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली होती. ही सर्व वाहने आरटीओ कार्यालयांनी वापरात आणली आहेत.
यंत्रणा झाली कार्यान्वित
या वाहनांवर अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवली असून, या यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण २०० मोटार वाहन निरीक्षक, तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षकांना गेल्या महिन्यात दिले होते.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा शोध घेण्यास मदत
अपघातप्रवण क्षेत्र, महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच आवश्यक ठिकाणी या वाहनांद्वारे कारवाई सुरू आहे. रडार यंत्रणेच्या माध्यमातून एका वेळेस ४ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधण्यास मदत होत असून, तासाभरात शेकडो वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारवाई अधिक तीव्र करणार
इंटरसेप्टर वाहनांद्वारे आरटीओने केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक प्रकरणे हेल्मेट न घालणाऱ्या बाइकचालकांची आहेत.
त्याखालोखाल हेल्मेट न घालणारे सहप्रवासी, ओव्हर स्पीड करणाऱ्या आणि सीटबेल्ट न वापरणाऱ्या कारचालकांचा समावेश आहे. ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत आरटीओकडून देण्यात आले आहेत.
आधुनिक वाहने आली वापरात
ही वाहने सर्व आरटीओ कार्यालयांनी वापरात काढली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.