Join us

पैजेचा स्टॅम्प ! हर्षवर्धन पाटलांच्या 'जय-पराजया'ची 'भन्नाट शर्यत' लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 16:03 IST

हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक नितीन भारत साबळे यांनी सोमनाथ भारत बनसोडे यांच्याविरुद्ध ही पैज लावली आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकांवेळी उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यात कोणता उमेदवार विजयी होणार याबाबत पैज लागली होती. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकांमध्येही उमेदवारांवर पैज लावण्यात येत आहे. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघात पहिली पैज लागली आहे. भाजपाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांच्या समर्थकांमध्ये ही पैज लावण्यात आली आहे. 

हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक नितीन भारत साबळे यांनी सोमनाथ भारत बनसोडे यांच्याविरुद्ध ही पैज लावली आहे. त्यानुसार, हर्षवर्धन पाटील विजयी झाल्यास सोमनाथ बनसोडे हे पराभूत उमेदवार जितक्या मतांनी पडला तितकी रक्कम स्वखुशीने नितीन साबळे यांना देतील. तसेच, जर दत्ता भरणे विजयी झाले तर, हर्षवर्धन पाटील जितक्या मतांनी पराभूत होतील तितकी रक्कम रोख स्वरुपात सोमनाथ बनसोडे यांना नितीन साबळेंकडून देण्यात येईल, असे लेखी स्वरुपात दिले आहे. या लेखी पत्रकावर स्टॅम्प (तिकीट) लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आनंदनगर गावचे उपसरपंच रोहित मोहोळकर यांनी या पैजेच्या रकमेची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार, निकालानंतर 20 दिवसात संबंधित रक्कम विजयी उमेदवाराच्या समर्थकांना देण्यात येणार आहे. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्या समर्थकांमधील या पैजेसाठी 5 साक्षीदारांनीही सह्या दिल्या आहेत. एका लेखी पत्रकारवर स्टॅम्प तिकीट लावून सरकारी दस्तावेज पद्धतीने ही पैज लागली आहे. 

 

टॅग्स :इंदापूरपुणेमुंबईपैसाविधानसभा निवडणूक 2019