मद्याची जाहिरात असलेले साईनबोर्ड त्वरित हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:16 IST2018-05-08T04:16:40+5:302018-05-08T04:16:40+5:30
मद्य विक्रीच्या दुकानाच्या साईनबोर्ड वर असलेल्या विविध मद्य कंपन्यांच्या जाहिराती १५ दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात जारी केले आहेत. मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर केवळ परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक, पत्ता, दुकान सुरू व बंद होण्याची वेळ इतकाच मजकूर लावण्यास कायद्यानुसार परवानगी आहे.

मद्याची जाहिरात असलेले साईनबोर्ड त्वरित हटवा
मुंबई - मद्य विक्रीच्या दुकानाच्या साईनबोर्ड वर असलेल्या विविध मद्य कंपन्यांच्या जाहिराती १५ दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात जारी केले आहेत. मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर केवळ परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक, पत्ता, दुकान सुरू व बंद होण्याची वेळ इतकाच मजकूर लावण्यास कायद्यानुसार परवानगी आहे. मात्र, या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असून मद्यविक्री करणाºया दुकानांवर विविध मद्य कंपन्यांचे आकर्षक स्वरूपातील साईनबोर्ड लावण्यात येतात. त्यामुळे सरकारने मद्यविक्रीचा परवाना देताना परवानाधारकाला घातलेल्या अटींपैकी ५ व्या क्रमांकाच्या अटीचा भंग होत असल्याचा उल्लेख परिपत्रकात करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व उपायुक्त व सर्व अधिक्षकांनी या परिपत्रकाचे पालन करावे व आपापल्या हद्दीतील परवानाधारकांनी या अटींचे पालन केले नाही तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश उत्पादन शुल्कच्या आयुक्त अश्विनी जोशी यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
विदेशी, देशी व इतर सर्व प्रकारच्या दारूची विक्री करणाºया दुकानांसाठी हे निर्देश लागू करण्यात आले आहेत. मद्याची जाहिरात करणारा कोणताही मजकूर दुकानाच्या दर्शनी भागात दिसणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.