Join us

बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 11:16 IST

आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजता ही कारवाई करण्यात आली. राज्यातील २ मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून केला आहे. यासंदर्भात शरद पवार यांना पत्रकारांनी बारामतीमध्ये प्रश्न विचारला. त्यावर, पवारांनी एका वाक्यात उत्तर प्रतिक्रिया देत उत्तर देणं टाळलं. 

आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे. मात्र, याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई होत असल्याचा आरोपही केला होता. त्यासंदर्भात आता शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

शरद पवार बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी आज दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध संस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी, शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला असता, त्यांना त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी स्पष्टपणे टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

काय म्हणाले रोहित पवार

सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

सत्ताधाऱ्यांवर निशाणा

ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही, असा टोलाही आमदार रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लगावला. 

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारबारामती