Join us  

"तुमचा अहंकार बाजूला ठेवा अन्..."; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिदेंना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 10:55 AM

आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही वरळीतील एका पुलावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता

मुंबई - शिवसेना आमदार आदित्य ठाकरेमुख्यमंत्री शिंदे आणि राज्य सरकारविरुद्ध कायमच आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात जाऊन त्यांना चॅलेंज केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्याविरुद्ध ठाण्यात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच दिले होते. आता, पुन्हा एकदा आदित्य यांनी मुंबईतील एका उड्डाण पुलावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणत शिंदेंवर निशाणा साधला. तसेच, स्वत:चा अहंकार बाजूला ठेऊन उड्डाण पूल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही वरळीतील एका पुलावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच, पुल बांधून पूर्ण असतानाही प्रवाशांसाठी खुला करण्यात न आल्याने संताप व्यक्त करत स्वत:च तो पुल सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, काही दिवसांतच हा पुल सर्वांसाठी सुरू करण्यात आला आहे. आता, मुंबईतील विमानतळाकडे जाणारा उड्डाण पुल बांधून तयार आहे, पण त्याचे लोकार्पण होत नाही. एकीकडे वाहतूक कोडींची समस्या असतानाही केवळ अहंकारासाठी हा पुल मुख्यमंत्र्यांनी हा पुल सुरू केला नसल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे. 

हा डोमेस्टिक एअरपोर्ट जंक्शनवरील उड्डाणपूल आहे, जो आठवडाभरापासून पूर्णपणे तयार आहे. पण, बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांना लोकांसाठी वेळ नसल्यामुळे त्याचे उद्घाटन झाले नाही. येथील पुलावर दररोज रात्री खांबावरील लाईट सुरू असतात, तर दुसरीकडे मुंबईकर तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. ह्या मूलभूत गोष्टींसाठी मुंबईकर आपली बाजू मांडत आहेत. मात्र, निर्लज्ज राज्यकर्ते मुंबईकरांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत आहेत, हे अत्यंत संतापजनक आहे, असे ट्विट आदित्य यांनी केले आहे. 

आदित्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मी बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेऊन विचार एमएमआरडीएला हा पुल सुरू करण्यासाठी आजच विचारलं पाहिजे. बघुयात, मुख्यमंत्री आपला अहंकार बाजुला ठेवतात का ते?, असेही आदित्य यांनी म्हटले. तसेच, आदित्य यांनी गोखले पुलाच्या उद्घाटनाबाबतही मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. तर, मी मुंबईकर आणि माध्यमांना हे दोन्ही पुल पाहण्यासाठी येण्याचं निमंत्रण देतो, जे बांधून तयार आहेत, पण उद्घटनाच्या प्रतिक्षेत आहेत, असे आदित्य यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमुंबईमुख्यमंत्री