दारूच्या बाटलीवरही कॅन्सर धोक्याचा इशारा द्या; एफएसएसआयएला उच्च न्यायालयाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:20 IST2025-01-31T09:20:26+5:302025-01-31T09:20:41+5:30
दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरबाबत कोणताही धोकादायक इशारा न दिल्याने दारू सेवनाशी संबंधित आरोग्याचे धोके वाढतात.

दारूच्या बाटलीवरही कॅन्सर धोक्याचा इशारा द्या; एफएसएसआयएला उच्च न्यायालयाची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सिगारेटच्या पाकिटाप्रमाणे दारूच्या बाटल्यांवरही कॅन्सरचा धोकदायक इशारा देणे बंधनकारक करावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणला (एफएसएसआय) उत्तर देण्याचे निर्देश दिले.
सिगारेटच्या पाकिटाप्रमाणे दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरबाबत कोणताही धोकादायक इशारा न दिल्याने दारू सेवनाशी संबंधित आरोग्याचे धोके वाढतात. ग्राहकांना ते वापरत असलेल्या उत्पादनांची पूर्ण आणि अचूक माहिती मिळविण्याचा अधिकार आहे,
असे पुण्याचे रहिवासी यश चिलवार (वय २४) यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.
२५ जून २०२४ रोजीच्या जागतिक आरोग्य संघटना आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, मद्यसेवनामुळे ३० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात देशांनी पुढाकार घेऊन हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. दक्षिण कोरिया आणि आयर्लंडसारख्या देशांनी आधीच दारूच्या बाटल्यांवरील लेबलवर कॅन्सरसंबंधी धोकदायक इशारा दिला आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
लोकांना अल्कोहोलसंबंधी आरोग्य धोक्यांबद्दल जागरूता निर्माण केल्यास दारू सेवन करणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट होईल, असे याचिकेत म्हटले आहे.