Join us  

शुद्ध हवा, शुद्ध पाणी हा आमचा मूलभूत अधिकार; मुख्यमंत्र्यांकडून माहुलवासीयांना अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 3:09 AM

सरकारने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे

मुंबई : आमचा मृत्यू हा नैसर्गिक असावा. प्रदूषित पाणी आणि हवेने आमचा मृत्यू होऊ नये. सरकारने जाणीवपूर्वक माहुलकरांची हत्या करू नये. आमच्या मुलाबाळांना तरी या प्रदूषणयुक्त वातावरणातून बाहेर काढावे. महत्त्वाचे म्हणजे, माहुलकरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे; असे म्हणणे पुन्हा एकदा माहुलवासीयांनी मांडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवनिर्वाचित उद्धव सरकारकडून माहुलकरांना अपेक्षा असून, किमान आता उद्धव सरकार तरी आमच्याकडे लक्ष देईल का? असा सवाल प्रदूषित अशा माहुल परिसरात वास्तव्य करत असलेल्या नागरिकांनी विचारला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूच्या अहवालांचे दाखले देत, विविध सेवाभावी संस्थांकडून पर्यावरण संवर्धनासाठी आवाज उठविला जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील स्वच्छ हवेबाबत विशेषत: माहुलसारख्या प्रदूषित परिसरात राहत असलेल्या नागरिकांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून माहुलमधून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात विविध राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी माहुलवासीयांना आश्वासने दिली, पण कार्यवाही शून्य आहे.

आता नवनिर्वाचित उद्धव सरकारकडून माहुलवासीयांना आशा आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच, आरे प्रकरणात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. आणखी काही प्रकरणांत दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत उद्धव सरकारने निर्णय घेतले. परिणामी, माणूस म्हणून जगात यावे. शुद्ध हवा घेता यावी. शुद्ध पाणी पिता यावे. प्रदूषणाने गळा घोटू नये. विविध आजार जडू नयेत, म्हणून किमान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे पाहावे; सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने जाणीवपूर्वक माहुलकरांची हत्या करू नये, असे म्हणणे माहुलवासीयांनी मांडले आहे.

निरीचा अहवाल : परिसर राहण्यायोग्य नाही

तानसा जलवाहिनीव्यतिरिक्त विविध प्रकल्पग्रस्तांनाही माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले असून, हा आकडा सुमारे २ हजार आहे.एकंदर सद्य:स्थितीत माहुल येथे वास्तव्य करीत असलेल्या प्रकल्पबाधितांची संख्या सुमारे ७ हजार ५०० आहे. मात्र, माहुल येथील परिसर प्रदूषित असून तो राहण्यायोग्य नाही, असा अहवाल ‘निरी’ने दिला असून, येथील वायुप्रदूषणामुळे अनेकांना आजार जडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कुठे होऊ शकते स्थलांतर?

कुर्ला येथे ‘एचडीएल’ने १८ हजार घरे बांधली आहेत आणि मुंबई शहर, तसेच उपनगरात ठिकठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी ८० हजार घरे बांधण्याचे काम सुरू आहे. कुर्ला येथील घरे विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडीधारकांसाठी बांधण्यात आली असून, यातील काही घरे इतर प्रकल्पबाधितांना देण्यात आल्याचे म्हणणे माहुलवासीय सातत्याने आंदोलनादरम्यान मांडत आहेत. कुर्ला, कांजूरमार्ग, भांडुप येथे घरे उपलब्ध आहेत.

कुर्ला येथे ‘एचडीएल’ने १८ हजार घरे बांधली आहेत आणि मुंबई शहर, तसेच उपनगरात ठिकठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी ८० हजार घरे बांधण्याचे काम सुरू आहे. कुर्ला येथील घरे विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडीधारकांसाठी बांधण्यात आली असून, यातील काही घरे इतर प्रकल्पबाधितांना देण्यात आल्याचे म्हणणे माहुलवासीय सातत्याने आंदोलनादरम्यान मांडत आहेत. कुर्ला, कांजूरमार्ग, भांडुप येथे घरे उपलब्ध आहेत.

आयआयटीचा अहवाल काय म्हणतो?

  1. माहुलमध्ये राहणे ही जोखीम आहे.
  2. माहुलमधील हवा दिवसातील बराच वेळ पुनर्वास स्थळाच्या दिशेने वाहते.
  3. रिफायनरीजमधील धूरसुद्धा या भागात बराच वेळ वाहत असतो.
  4. पुनर्वसनासाठीच्या इमारतींचे नियोजन चुकीचे.
  5. घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि हवा पोहोचत नाही.
  6. माहुल येथील ५ हजार ५०० प्रकल्पग्रस्त स्थलांतरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
  7. माहुलमध्ये पुनर्वसित लोकांच्या जिवाला प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे धोका आहे.
  8. सरकारने त्यांना सुरक्षित ठिकाणी पर्यायी घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
  9. प्रदूषणामुळे होत असलेल्या आजारांनी आतापर्यंत १५० जणांचा बळी घेतला आहे.
टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएमआयडीसीपर्यावरणमहाराष्ट्र सरकार