Join us

दररोज २५ रुपये दराने १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 06:19 IST

उत्पादकांना दिलासा; चार-पाच दिवसांत दूध संकलन होणार सुरू

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लीटर दुधाची २५ रुपये प्रतिलीटर दराने खरेदी करेल. चार-पाच दिवसांत हे संकलन सुरू होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरू राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दूध व्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. दूध विक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लीटर दुधापैकी १० लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खासगी बाजारात दुधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलीटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लीटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन २५ रुपये प्रतिलीटर दराने खरेदी करेल.

दुधाची भुकटी करून ती साठवली जाईल, नंतर त्याची आॅनलाइन विक्री केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असून यातून शेतकºयांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, असे पवार यांनी सांगितले.

सरकार शेतकºयांच्या पाठीशी

राज्य सरकार शेतकºयांच्या पाठीशी आहे. दूध पावडर तयार करण्याच्या निर्णयामुळे शेतकºयांना दिलासा मिळेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी व दूध महासंघ व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारशेतकरी