Join us
Daily Top 2Weekly Top 5

PNB Scam : ‘डिजिटल’ प्रणालीमुळे घोटाळ्यांना आळा बसण्याचे दावेही पोकळ कसे ठरतात?, उद्धव ठाकरेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 08:54 IST

सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळा घडवून आणणारा प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तीन जण देश सोडून फरार झालेत.

मुंबई -  सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळा घडवून आणणारा प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तीन जण देश सोडून फरार झालेत. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे उघड झाले. या घोटाळ्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  ''या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार गजाआड जाणार की तेदेखील ‘जिवाचा मल्ल्या’ करून घेण्यात यशस्वी होणार?,''   असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, ''रिझर्व्ह बँकेचे कठोर नियम आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या डोळ्य़ात धूळ फेकण्यात घोटाळेबाज कसे यशस्वी होतात? तुमच्या त्या ‘डिजिटल’ प्रणालीमुळे घोटाळय़ांना आळा बसण्याचे दावेही पोकळ कसे ठरतात?'', असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला हाणला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?बँकांमधील घोटाळे आणि महाघोटाळे आपल्या देशाला नवीन नाहीत. या ‘घोटाळाग्रस्त’ बँकांच्या यादीत आता पंजाब नॅशनल बँक या मान्यवर बँकेचीही भर पडली आहे. घोटाळ्य़ाची रक्कम काही हजार कोटी असण्याची ‘परंपरा’ येथेही पाळली गेली आहे. उद्योगपती नीरव मोदी हा या घोटाळ्य़ाचा सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा वगैरे दाखल झाला असून अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ‘ईडी’ची छापेमारी, सीबीआयचा तपास, काही बँक कर्मचाऱ्यांचे निलंबन वगैरे नेहमीची ‘वरातीमागची घोडी’ धावू लागली आहेत. त्याने काय साध्य होणार आहे? आजपर्यंत प्रत्येक बँक घोटाळ्य़ात हेच घडले. पुन्हा अशाप्रकरणी ज्या अटका सटका होतात त्यादेखील अनेकदा प्राथमिक स्तरावरील लोकांच्या असतात. मुख्य सूत्रधार किंवा बडे मासे तपास यंत्रणांच्या जाळ्य़ात क्वचितच सापडतात. सापडले तरी काही काळ तुरुंगात काढून नंतर जामिनावर सुटतात. पुढे या खटल्यांचे काय होते, ते किती काळ चालतात, या आरोपींना काय शिक्षा होते, त्यांच्याकडून किती वसुली होते या गोष्टी गुलदस्त्यातच राहतात. आता तर विजय मल्ल्यासारख्या मद्यसम्राटाने घोटाळेबाज उद्योगपतींना ‘कोट्य़वधींचे घोटाळे करा, सरकारी यंत्रणांच्या डोळ्य़ांदेखत देशातून पसार व्हा आणि प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानी यंत्रणांकडून होणाऱ्या खटपटींचा आनंद लुटा!’ असा ‘खुष्कीचा मार्ग’च दाखवून दिला आहे. 

या ‘मल्ल्या मंत्रा’चा प्रभाव जर देशातील घोटाळेबाजांवर पडू लागला तर आधीच ७ लाख ३३ हजार कोटी एवढय़ा प्रचंड बुडीत कर्जांमुळे हेलकावे खाणाऱ्या आपल्या बँकिंग क्षेत्राचा पाय आणखी खोलात जाईल. १९९३ मध्ये हर्षद मेहता प्रकरणाने ‘शेअर घोटाळा’ हे नाव देशाला माहीत झाले. नंतर २००१ मध्ये केतन पारेख या शेअर दलालाने ‘बँक घोटाळा’ हे नाव देशाला ज्ञात करून दिले. आता नीरव मोदीने ज्या बनावट ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’च्या आधारे पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावला तीच पद्धत केतन पारेखने त्या वेळी वापरली होती. मधल्या काळात इतरही अनेक बँका वेगवेगळ्य़ा घोटाळ्य़ांनी गाजल्या. महाराष्ट्रातील सहकारी बँका तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी बदनामच झाल्या आहेत. त्यामुळे सरकारची त्यांच्यावर कायम वक्रदृष्टी राहिली आहे. पण मग राष्ट्रीयीकृत किंवा इतर शेड्य़ूल्ड बँकांनी तरी कोणते दिवे लावले आहेत, असाच प्रश्न पंजाब नॅशनल बँकेच्या या घोटाळय़ाने समोर येतो. पुन्हा पंजाब नॅशनल बँकेतील प्रकरण २०११ मधील आहे आणि त्याचा ‘स्फोट’ २०१८ मध्ये झाला. मग मधली सात वर्षे नेमकी कोणती कारवाई झाली? झाली नसेल तर का नाही झाली? ११ हजार कोटींचा घोटाळा उघड होऊनही प्रत्यक्ष गुन्हे दाखल व्हायला, छापे वगैरे मारण्यासाठी सहा वर्षे का लागली? या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नसतील तर केतन पारेख प्रकरणातून आमच्या बँका, तपास यंत्रणा, रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी काहीच धडा घेतलेला नाही असेच म्हणावे लागेल. 

बँक कर्मचारी, अधिकारी आणि घोटाळेबाज यांच्या संगनमतानेच असे घोटाळे होतात हे खरेच, पण रिझर्व्ह बँकेचे कठोर नियम आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या डोळ्य़ात धूळ फेकण्यात घोटाळेबाज कसे यशस्वी होतात? तुमच्या त्या ‘डिजिटल’ प्रणालीमुळे घोटाळय़ांना आळा बसण्याचे दावेही पोकळ कसे ठरतात? २०११ ते २०१८ ही सात वर्षे फक्त चौकशीतच कशी जातात? छाप्यांमध्ये ‘महत्त्वाची’ कागदपत्रे जप्त, कार्यालयांना ‘सील’ ठोकणे यापलीकडे काही ठोस हाती लागणार आहे का? या घोटाळ्य़ाचे मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी गजाआड जाणार की तेदेखील ‘जिवाचा मल्ल्या’ करून घेण्यात यशस्वी होणार? प्रश्न अनेक आहेत आणि त्यांची उत्तरे नेहमीप्रमाणे गुलदस्त्यात राहण्याचीच शक्यता जास्त आहे. केतन पारेख ते नीरव मोदी व्हाया विजय मल्ल्या असा आपल्या देशातील बँक घोटाळय़ांचा प्रवास आहे. या प्रवासात बँक आणि सरकारचे हजारो कोटी बुडाले आणि घोटाळा करणारे मध्येच उतरून फरार झाले किंवा जामिनावर ‘मोकळे’ सुटले. बँक घोटाळे सुरूच आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या निमित्ताने त्यात आणखी एका घोटाळ्य़ाची भर पडली आहे इतकेच!

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळानीरव मोदीनरेंद्र मोदीडिजिटलउद्धव ठाकरे