आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार - भगवंत मान
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 22, 2023 17:08 IST2023-01-22T17:07:45+5:302023-01-22T17:08:30+5:30
आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले.

आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार - भगवंत मान
मुंबई: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सर्व शाळा चांगल्या झाल्या आहेत, ठिकठिकाणी मोहल्ला क्लिनिक सुरू झाले आहेत. त्याची संपूर्ण भारतभर चर्चा आहे. त्याच प्रमाणे पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी पार्टीचे सरकार आहे आणि आम्ही सुद्धा सर्व शाळा चांगल्या करणार आहोत. येत्या २७ जानेवारीला ५०० मोहल्ला क्लिनिकचे उद्घाटन पंजाबमध्ये केले जाणार आहे. आम आदमी पार्टी शाळा, वीज, पाणी, हॉस्पिटल, पायाभूत सुविधा, रोजगार या जनतेच्या मूलभूत मुद्द्यांवर काम करते, आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाही, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मुंबईत केले.
पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये व्यापारी संबंध दृढ बनविण्याच्या उद्देशाने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबईत आले आहेत. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्या संदर्भात माहिती देतांना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी पंजाबमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जे उद्योजक जायचे त्यांच्याकडून पूर्वी गुंतवणुकीमध्ये हिस्सा मागितला जायचा. एक दोन परिवारांनाच त्याचा फायदा व्हायचा. पण आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे जनतेचे सरकार आले आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये उद्योगधंदे आल्यास त्याचा पंजाबमधील ३ करोड जनतेला लाभ होईल. कोणालाही त्यात हिस्सा दिला जाणार नाही. सिंगल विंडो सरकार असेल. परवानगीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. मुंबईतील बहुतांश उद्योजक पंजाबी आहेत. त्यांना आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करण्याची ही योग्य संधी आहे. त्यासाठी मी त्यांना भेटायला आलो आहे.
आगामी निवडणुकांबाबत बोलताना भगवंत मान म्हणाले की, आम आदमी पार्टी फक्त महानगरपालिका निवडणूक नाही, तर मुंबई व महाराष्ट्रामध्ये होणारी प्रत्येक निवडणूक मग ती जिल्हापरिषद असो किंवा ग्रामपंचायत निवडणूक असो, प्रत्येक निवडणूक आम आदमी पार्टी सर्व जागांवर लढवणार आहे. तो आमचा अधिकार आहे. बाकी निर्णय घेण्याचा अधिकार जनतेचा आहे.