सार्वजनिक वाहतूक ‘बेस्ट’ आहे!आणिक आगारात उलगडते सार्वजनिक वाहतूक प्रणालीतील स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:50 AM2017-12-15T02:50:35+5:302017-12-15T02:50:44+5:30

मुंबई शहरासह उपनगरात आणि नवी मुंबईपर्यंत मजल मारलेली बेस्ट बस आजघडीला तोट्यात आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेला हा उपक्रम आज आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Public transport is the 'best' place! | सार्वजनिक वाहतूक ‘बेस्ट’ आहे!आणिक आगारात उलगडते सार्वजनिक वाहतूक प्रणालीतील स्थान

सार्वजनिक वाहतूक ‘बेस्ट’ आहे!आणिक आगारात उलगडते सार्वजनिक वाहतूक प्रणालीतील स्थान

Next

- सागर नेवरेकर

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात आणि नवी मुंबईपर्यंत मजल मारलेली बेस्ट बस आजघडीला तोट्यात आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेला हा उपक्रम आज आर्थिक कोंडीत सापडला आहे. कर्मचारीवर्गाचे पगारही काढता येत नाहीत, अशी बेस्टची स्थिती
आहे. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी बेस्टने मुंबई महापालिकेला मदतीचे साकडे घातले आहे. भविष्यात बेस्ट आर्थिक कोंडीतून बाहेर पडेल की नाही, हे काळच ठरवेल. मात्र असे असले तरी या बेस्टने मुंबापुरीची शान जपली आहे. सार्वजनिक वाहतूक प्रणालीत महत्त्वाचे स्थान कायम ठेवत धावणारी मुंबईकरांची बेस्ट बस नक्की आहे तरी कशी याचे महत्त्व विशद केले जाते ते वडाळा येथील बेस्टच्या आणिक आगारात.
वडाळा येथील आणिक बस आगारामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व हे बेस्ट संग्रहालयाच्या माध्यमातून विशद केले जात
आहे. आताच्या परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक किती महत्त्वाची आहे, हे या संग्रहालयातून सांगितले जात आहे. त्यामुळे संग्रहालयाला विद्यार्थी, तरुण पिढी आणि अभ्यासू मोठ्या संख्येने भेट देत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा इतिहास काय आहे, याचा आढावा ‘लोकमत’ने घेतला आहे.
बेस्ट उपक्रमाला १४३ वर्षांचा अभूतपूर्व असा इतिहास लाभला आहे. बेस्ट आतापर्यंत जनतेला अविरतपणे सेवा-सुविधा पुरवीत आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी अनेक बेस्ट कर्मचारी सदैव कार्यरत असतात. सर्व स्तरांवरील जनतेला रास्त दरात बेस्टने प्रवास उपलब्ध करून दिला आहे. तरीदेखील अलीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे लोक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या वाढत आहे. पहिल्या काळात ज्याच्याकडे चारचाकी वाहन
म्हणजे तो श्रीमंत माणूस समजला जात असे, परंतु आता चारचाकी
वाहन हे श्रीमंताचे न राहता सर्वसामान्य व्यक्तीदेखील चारचाकी आणि दुचाकी घेऊन फिरताना दिसतो. माणसाला हे कळत नाही आहे
की, आपणच आपला घात करत आहोत. दिवसेंदिवस वाढत्या वाहनांमुळे वातावरणातील
प्रदूषण वाढत आहे. जर का खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला तर वाहतूक समस्या नियंत्रणात येईल. (पूर्वार्ध)

घोड्याने ओढली जाणारी ट्राम गाडी (९ मे १८७४) :
अमेरिकेतील बोस्टन व न्यूयार्क शहरातील लोकांनी तेथे शेअर्स लावून १८७३ साली मुंबई येथे रजिस्ट्रेशन मिळवले. ९ मे १८७४ रोजी बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेडने घोड्याने ओढली जाणारी व लोखंडी रुळावरून धावणारी ‘ट्राम’ गाडी ‘गँ्रट बिल्डिंग (कुलाबा) ते पायधुनी’ या मार्गावर सुरू केली. त्या वेळी प्रवासाचे तिकीट अवघे १ आणे होते. एका घोड्याने ओढणारी ट्राम आणि दोन घोड्यांनी ओढणारी ट्राम असे दोन मॉडेल ट्राममध्ये होते. एका घोड्याने ओढणाºया ट्राममध्ये २५ प्रवासी बसत होते. दोन घोड्यांनी ओढणाºया ट्राममध्ये ४० प्रवासी बसत होते. ट्रामसाठी लागणारे घोडेसुद्धा वेगवेगळ्या जातीचे वापरले जात होते. यात एका घोड्याने ओढणाºया ट्रामला ‘वॉलर्स’ जातीचा घोडा वापरला जाई, तर दोन घोड्यांनी ओढणाºया ट्रामला ‘गल्फ अरब’ आणि ‘पर्शियन’ जातीचे घोडे वापरत असत. त्या वेळी घोड्यांची देखभाल करण्यासाठी वेगळी मॅनेजमेंट टीम होती.

विजेवर चालणारी
ट्राम गाडी (७ मे १९०७)
बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रामवे कंपनी लिमिटेडने ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम सुरू केली. ही ट्राम दोन्ही बाजूने चालविता येत होती. ट्रामच्या प्रवासाचे तिकीट १९५७ सालापर्यंत १ आणे होते. त्यानंतर ट्राम बंद होईपर्यंत (३१ मार्च १९६४) १० नवे पैसे होते. त्यामुळे ट्रामच्या प्रवासाला खूपच झुंबड उडत असे.

पहिली आॅमनी बस
(१५ जुलै १९२६)
मुंबई शहरात कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट या दरम्यान पहिल्यांदा आॅमनी बस सेवा दर दहा मिनिटांच्या अंतराने सुरू करण्यात आली. सुरुवातीला बसच्या ताफ्यात एकूण २४ (२२ थ्रॉनीक्रॉफ्ट व २ डॉज) बस गाड्या होत्या. प्रवाशांनी बसमधून प्रवास करावा म्हणून (१९२७ ते १९३० च्या दरम्यान) त्यात पोस्टाच्या पेटीची सोय केली होती. बसचे भाडे २ आणे ते ६ आणे होते.

दुमजली बस
(१९३७)
वाढत्या वाहतुकीची गरज भागविण्याकरिता १९३७ सालात ‘बेस्ट’ कंपनीने दुमजली बसगाडी सुरू केली. त्यामुळे दुप्पट प्रवाशांची सोय झाली.

छप्पर नसलेली बस
(१९३९)
१९३९ साली दुसºया महायुद्धाच्या कालावधीत युद्धकालीन अपरिहार्य म्हणून एक मजली बसगाडीच्या बांधणीत फेरबदल करून टपावर बसण्याची सोय करण्यात आली. बसच्या वरील भागाला छप्पर नव्हते.

रॉयल टायगर एकमजली जोड-ट्रेलर बस (१९६६)
सातत्याने वाढणारी प्रवाशांची संख्या व इंधन समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने बेस्टच्या कार्यशाळेत ही बस बनविली गेली. परंतु, शहरातील वाढत्या वाहनसंख्यमुळे ही बस अडचणीची ठरू लागली, म्हणूनच ही बस फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही. ही लांबलचक बस वळविताना व मागे घेताना कुशल चालकाची आवश्यकता भासे. मुख्य बसच्या मागे (इंजीन व इतर यंत्रणा काढून त्या जागी आसने असलेली) दुसरी एक बस रेल्वेप्रमाणे कपलिंगद्वारे जोडलेली असे. या जोडाच्या ठिकाणी घडीच्या संरक्षक जाळीची व्यवस्था असे. या प्रकारात प्रवाशांना एका बसच्या अंतर्भागातून दुसºया बसमध्ये जाणे शक्य नसे, त्यामुळे यात दोन बसवाहक असत.

सेमी-आर्टिक्युलेटेड दुमजली ट्रेलर बस (१९६७ ते १९८६)
प्रवासीकक्ष असलेली दुमजली बस व या ट्रेलरला वाहून नेणारा जोडलेला ट्रॅक्टर अशी वैशिष्ट्यपूर्ण बस सर्वप्रथम देशात बेस्टने मुंबईच्या प्रवाशांना सादर केली. जास्तीत जास्त १०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता फक्त याच बसची होती. ट्रॅक्टर-ट्रेलर जेथे जोडले जातात त्या ट्रेलरच्या तळमजल्यावरील कमी उंचीच्या भागात ‘सावधान! डोके आपटेल’ असे फलक असत. अभियांत्रिकी देखभालीसाठी या बसचा ट्रॅक्टर, ट्रेलरपासून वेगळा काढता येत असे हे या बसचे प्रमुख वैशिष्ट्य. देखभालीच्या कामासाठी संपूर्ण बस अडकून राहू नये म्हणून ट्रॅक्टर वेगळा केल्यावर एका विशेष ट्रॅक्टरद्वारे (याला ‘फ्लोट’ म्हणत) उर्वरित ट्रेलर जोडून पुन्हा बस सेवेत दाखल होत असे. ट्रेलर बस अबालवृद्धांइतकीच शाळकरी मुलांमध्येही अत्यंत लोकप्रिय होती. आजही ती अनेकांच्या स्मरणात आहे.

बेस्ट व मुंबई पालिकेची जलवाहतूक (१९८१ ते २००२)
स्थानिक जनतेच्या मागणीचा विचार करून १ नोव्हेंबर १९८१ रोजी मालाड (प.) येथील मनोरी खाडीत मार्वे ते मनोरी या जलमार्गावर मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने प्रथमच बेस्टने जलवाहतूक सुरू केली. १६ लाख रुपये किमतीच्या दोन अत्याधुनिक नौका यासाठी प्रवर्तनात आणल्या. या यांत्रिक नौकेचा रंग निळ्या पाण्याशी संबंधित आकाशी असा आकर्षक होता.

९ मे १८७३ साली पहिली ‘घोड्याने ओढणारी ट्राम’ मुंबई शहरात धावायला लागली. बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये बॉम्बे ट्रामवे १८७४ नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढणारी ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. परंतु, ज्याप्रमाणे रेल्वेचे स्वागत लोकांनी केले, तसे ट्रामचे स्वागत झाले नाही. कारण, त्या काळातले टांगेवाले, पालखीवाले यांचा धंदा मोडीत निघाला होता.

ट्रामच्या रुळामध्ये खडी भरणे, ट्राम चालू द्यायची नाही, अशा विविध बाधा आणायला सुरुवात केली. दरम्यान, १९०५ साली बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेडने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून ‘विजेवर चालणाºया ट्राम’ धावू लागल्या.

१९२० साली जास्त गर्दी होत गेल्याने ‘डबलडेकर ट्राम’ चालवायला सुरुवात केली. तोपर्यंत ट्राम ही बºयाच लोकांपर्यंत पोहोचली होती. इलेक्ट्रिक ट्राम ही जलद, खिशाला परवडणारी, जादा प्रवासीक्षमता असल्याने लोकांना प्रचंड आवडली.

३१ मार्च १९६४ रोजी ट्राम सेवा बंद झाली. ट्रामचा ९० वर्षांचा इतिहास आहे. त्यानंतर १९२६ साली ‘पहिली सिंगल डेकर’ बस आली. तरीपण लोकांचे साधन हे ट्राम होते. लोक बसकडे लवकर वळले नाहीत.

कालांतराने मुंबईत रहदारी आणि लोकसंख्या वाढू लागली. तेव्हा ट्राम अडचणीत येऊ लागली. बसचा वेग ट्रामपेक्षा जास्त होता. मग ट्राम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

Web Title: Public transport is the 'best' place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट