Join us  

Video: पुनश्च हरी ओम... लॉकडाऊनचा कालावधी संपून पूर्वपदावर येण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 8:54 PM

राज्य सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले आहेत

मुंबई - केंद्र सरकारपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनंही आपली नियमावली प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्यानेही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असून ५ जूनपासून मार्केट कॉम्प्लेक्स, सर्व बाजारपेठ आणि दुकानांना सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. त्यावेळी, लोकमान्य टिळकांचा दाखला देत पुनश्च हरी ओम.. म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करत असून आता, प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असल्याचे ठाकरे यांनी म्हटलंय. 

राज्य सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे, लॉकडाऊनऐवजी आता मिशन बिगेन अगेन सुरु झालं आहे. एकीकडे लॉकडाऊन केलं असताना दुसरीकडे पूर्वपदावर येण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कालावधीत संपूर्ण राज्यात काही स्थळं व व्यवसायास बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुनश्च हरी ओम... केल्यानंतरही काळजी घेणं अनिवार्य असून तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे बंधनकारक आहे. सध्या, पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, केंद्र सरकारनेही कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राच्या काही नियमांना अनुसरुन तर काही राज्य सरकारचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे, राज्यात  धार्मिक आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. त्यासोबतच, हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमुख्यमंत्री