२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 07:32 IST2025-08-29T07:30:51+5:302025-08-29T07:32:35+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबई निघाले आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २८०० ट्रक, टेम्पोंसह प्रवासी वाहने खालापूर टोल नाक्यावरून पास झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. साडेआठनंतर वाहनांची संख्या वाढली होती.

२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
नवी मुंबई - मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबई निघाले आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २८०० ट्रक, टेम्पोंसह प्रवासी वाहने खालापूर टोल नाक्यावरून पास झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. साडेआठनंतर वाहनांची संख्या वाढली होती.
आता माघार नाही, आरक्षण घेऊनच जाणार. १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय, गरज लागली तरी मुंबईकर बांधवांचे सहकार्य घेऊ, गाडीतच मुक्काम, जेवणाचीही सोय केली आहे. निर्धार करूनच आलोय, अशी प्रतिक्रिया राज्यातून नवी मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांनी व्यक्त केली.
आंदोलनातून माघार नाही
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मनूर गावात मनूर गावातील मराठा आंदोलक गुरुवारी दुपारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचले. प्रत्येक गावातून स्वतंत्र वाहने करून मराठा समाज आंदोलनात सहभागी झाला आहे. राहण्याची, जेवणाची सर्व सोय केली आहे. गाडीतच मुक्काम करण्याची तयारी आहे. जानेवारी २०२४ मध्येही आम्ही नवी मुंबईत आलो होतो. आता मुंबईत धडक देणार. आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही, असे निश्चित केले आहे. पाऊस असो किंवा अनेक संकटे येवो, आंदोलनातून माघार घेणार नसल्याचेही स्पष्ट केले.
गाडीत जेवण बनविम्याचे व पुण्कामाचे आरक्षणा घेतल्याणिदाय आणार नाही निहार कवर आहे. विठीही कष्ट पहने, पाऊस पडला तरी आंदोलन शुभ राहील
- परमेश्वर पासले, बार्शी, मौलापुर
जेएनपीए बंदरातील वाहतूक अंशतः ठप्प
उरण : मराठा आंदोलक मुंबईत धडकण्यापूर्वीच जेएनपीए बंदरातील २५ टक्के अवजड वाहतूक ठप्प झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा आंदोलकांनी मुंबईकडे कूच केले आहे. त्यानुसार नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी परिसरातील सर्वच वाहतूक शाखांना वाहतूक नियंत्रणाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उरण, जेएनपीए हद्दीत अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी गुरुवारपासूनच बंदी घातली आहे. त्यामुळे 'जेएनपीए' अंतर्गत असलेल्या पाच बंदरांपैकी सिंगापूर पोर्ट (पीएसए) बंदरातील कंटेनर अवजड वाहतुकीवर गुरुवारी २५ टक्के परिणाम झाला आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर यात आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती जेएनपीएचे डीसीएम एस. के. कुलकर्णी यांनी दिली.
पोलिसांची सशर्त परवानगी
मुंबई - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी बुधवारी अखेर सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी केवळ एकाच दिवसासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित असणार आहे. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना मैदानात थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश पोलिसांनी दिले.
आंदोलनासाठी दिलेली परवानगी ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर आहे आणि न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाचे पालन करणे अनिवार्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवण्यात येईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
अशा आहेत अटी
आझाद मैदानात ७ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असून, या जागेची क्षमता लक्षात घेता ५ हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
मनोज जरांगे यांच्यासोबत असलेल्या पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत प्रवेश असेल, तर इतर वाहनांना वाडीबंदर जंक्शनपर्यंत मर्यादित ठेवले आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाच्या मार्गासाठी आधीच आखून दिलेला रस्ता वापरणे बंधनकारक केले आहे पूर्वपरवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई असेल. आझाद मैदानात अन्न शिजवण्यास सक्त मनाई असून मैदानाची स्वच्छता राखण्याची जबाबदारीदेखील आंदोलनकर्त्यांवरच सोपवली आहे.
लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्धांनी आंदोलनात सहभागी होऊ नये.