Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू केलेले उपोषण सोमवारीही कायम आहे. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक आझाद मैदानावर आले. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच मनोज जरांगे यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असताना त्यांच्या मागण्यांवर सरकार पातळीवर बैठकांचा जोर दिसून आला. मात्र, सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. 'बैठकांना जोर, चर्चेला मात्र ब्रेक' असे चित्र होते. दुसरीकडे आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत सोमवारपासून पाणीही पिणार नाही, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यातच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. मुंबईतील सीएसएमटीसह अनेक भागांमध्ये मराठा आंदोलकांनी केलेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली. रस्ते ठप्प झाले. अनेक भागातील मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली. अशातच मुंबईतील उच्च न्यायालयात एका तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे.
मनोज जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला सुट्टी असूनही या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. एमी फाउंडेशनने सदर याचिका दाखल केल्याचे समजते. न्या. गौतम अंखड, न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास का, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते पोलीस संरक्षणात उच्च न्यायालयात हजर झाले आहेत. या याचिकेच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री, नेते या बैठकीत उपस्थित आहेत. तत्पूर्वी, मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर बैठक झाली. अॅडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ यांच्याशी दीड तास चर्चा केली. दिवसभराच्या घटनाक्रमाची माहिती विखे पाटील यांनी फोनवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. जरांगे पाटील यांनी मराठा अभ्यासकांसमवेत आझाद मैदानावरील उपोषणस्थळी दीड तास चर्चा केली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत. सीएसएमटी स्थानक परिसर, मंत्रालयासह अनेक भागांत मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत. यामुळे गर्दीत भर पडत असून, अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे.