दीड मिनिटाचा वाद अन् लोकलमध्ये प्राध्यापकची हत्या; पत्नीला दिलेले वचन अपूर्णच, हतबल पित्याचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:44 IST2026-01-26T10:35:40+5:302026-01-26T10:44:49+5:30
मुंबई लोकलमध्ये गणिताच्या प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

दीड मिनिटाचा वाद अन् लोकलमध्ये प्राध्यापकची हत्या; पत्नीला दिलेले वचन अपूर्णच, हतबल पित्याचा आक्रोश
Mumbai Crime: मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. विलेपार्ले येथील प्रसिद्ध एनएम कॉलेजचे गणिताचे प्राध्यापक आलोक सिंह (३३) यांची एका सहप्रवाशाने किरकोळ वादातून हत्या केली. दुर्दैवी बाब म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी आलोक यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. आज पत्नीचा वाढदिवस आहे, आम्हाला डिनरला जायचे आहे, असे सहकाऱ्यांना सांगून आनंदाने घरी निघालेल्या आलोक यांचा प्रवास रक्ताच्या थारोळ्यात संपला.
आलोक यांचे सहकारी सुधीर त्रिवेदी त्या वेळी त्यांच्यासोबतच होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही अंधेरीवरून बोरीवली स्लो लोकल पकडली होती. गाडी मालाड स्थानकात येत असताना, दरवाजाजवळ उभा असलेल्या एका व्यक्तीने आलोक यांना उतरण्यासाठी बाजूला होण्यास सांगितले. समोर एक महिला उभी असल्याने आलोक यांनी त्याला थोडा वेळ थांबा असे सांगितले. बस, इतक्याच कारणावरून त्या व्यक्तीने शिवीगाळ सुरू केली आणि रागाच्या भरात आपल्या जवळील हिरे पकडण्याच्या तीक्ष्ण चिमट्याने आलोक यांच्या पोटावर वार केला. सुरुवातीला मला वाटले त्याने ठोसा मारला आहे, पण जेव्हा आलोक ओरडले आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या, तेव्हा समजले की त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे." आरोपीने मालाड स्थानक येताच पळ काढला.
पत्नीला वाटले अपघात, अंत्यसंस्कारानंतर समजले सत्य
आलोक यांचा विवाह अवघ्या दोन वर्षांपूर्वी झाला होता. मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेजमधील त्यांच्या घरी जेव्हा पार्थिव आले, तेव्हा संपूर्ण परिसर शोकाकुलात बुडाला होता. त्यांची पत्नी पूजा हिचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. धक्का सहन होणार नाही म्हणून पूजाला सुरुवातीला आलोक यांचा अपघात झाला आहे असे सांगण्यात आले होते. अंत्यसंस्कार विधी पार पडल्यानंतर तिला आपल्या पतीची निर्घृण हत्या झाल्याचे समजले.
अत्यंत संयमी आणि मृदूभाषिक होते आलोक
आलोक सिंह हे केवळ एक शिक्षकच नव्हते, तर त्यांच्या संयमी स्वभावामुळे ते सर्वांचे आवडते होते. "मी त्यांना कधीही मोठ्या आवाजात बोलताना पाहिले नाही," अशा शब्दांत त्यांच्या मेहुण्याने भावना व्यक्त केल्या. शेजाऱ्यांच्या मते, ते नेहमी हसतमुख असायचे आणि कोणाशीही कधीच भांडायचे नाहीत. जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून ते एनएम कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते.
वडील आहेत संरक्षणमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात
आलोक यांचे वडील, अनिल कुमार सिंह, हे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा पथकात तैनात आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी सुरू असतानाच त्यांना मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली. संतप्त वडिलांनी प्रशासनावर टीका करत म्हटले की, "जर ही घटना उत्तर प्रदेशात घडली असती, तर आतापर्यंत आरोपीचा एन्काउंटर झाला असता." संरक्षण मंत्र्यांनी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आलोक यांचे भाऊ महेश सिंह यांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "आलोक रक्ताच्या थारोळ्यात असताना त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस फलाटावरील बाकावर बसवून चौकशी करत बसले. जर वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित माझा भाऊ वाचला असता," असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच, एवढ्या गर्दीत आरोपी शस्त्रासह फिरतो आणि पळून जातोच कसा? असा सवाल करत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आरोपीला अटक आणि फाशीची मागणी
आरोपी ओमकार शिंदे (२७) हा मरीन लाईन्समध्ये डायमंड पॉलिशिंगचे काम करतो. तो हिरे पकडण्यासाठी वापरला जाणारा चिमटा सोबत बाळगत असे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी अटक केली.