आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 06:23 IST2025-10-30T06:21:40+5:302025-10-30T06:23:43+5:30
भारत जगासाठी ठरेल 'स्थिर दीपस्तंभ'

आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
मुंबई : जागतिक व्यापारातील तणाव व पुरवठा साखळीतील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा ‘ब्लू इकॉनॉमी’कडे वेगाने होत असलेला प्रवास बुधवारी मांडला. ‘भारत हा केवळ स्थिर दीपस्तंभच नाही, तर २१व्या शतकात सागरी विकासातून जगाला दिशा दाखवणारा देश ठरू शकतो,’ असे ते मुंबईत इंडिया मेरिटाइम वीक २०२५मध्ये म्हणाले.
गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरिटाइम वीक २०२५मधील मेरिटाइम लीडर्स परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी ग्लोबल मेरिटाइम सीईओ फोरमचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर, कीर्तिवर्धन सिंह आदी उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत १२ लाख कोटींच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा लाँगटर्म बिझनेस प्लॅन २०४७, ऑइल अँड गॅस पीएसयू ॲक्विझिशन प्लॅन २०३५, डोमेस्टिक ग्रीन टग ॲक्विझिशन प्रोग्राम, ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या १० वर्षांच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनचे अनावरण झाले. ब्लू इकॉनॉमी भारताच्या वाढीचे नवे इंजिन आहे. यामुळे व्यापार, पायाभूत सुविधा, रोजगाराला गती मिळाली आहे, असे माेदी म्हणाले.
पुढील २५ वर्षांचे लक्ष्य
पुढील २५ वर्षे निर्णायक आहेत. आमचे लक्ष ब्ल्यू इकॉनॉमी व शाश्वत किनारी विकासावर आहे. हिरवे लॉजिस्टिक्स, बंदर संपर्क, किनारी औद्योगिक क्लस्टर्स हे पुढील सुधारणा राबविण्याचे प्रमुख स्तंभ असतील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर भारत पुढे जात आहे. मोठ्या बंदरांची क्षमता चार पटीने वाढवण्यासाठी या क्षेत्रात सरकार ७० हजार कोटींची गुंतवणूक करत आहे, असेही मोदी म्हणाले.
ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय?
ब्लू इकॉनॉमी म्हणजे समुद्र, किनारे, नद्या व जलस्रोत यांचा वापर करून आर्थिक विकास साधणे, पण तो विकास शाश्वत, पर्यावरणपूरक असणे. यात समुद्री साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोग, सागरी परिसंस्थेचे जतन यावर भर दिला जातो.
भारताच्या समुद्रशक्तीचा नवआविष्कार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदींनी मेरिटाइम उद्योगाला नवी दिशा दिली आहे. त्यांनी समुद्रशक्तीचा नवआविष्कार करून दाखवला. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र मेरिटाइम क्षेत्रात नवी ताकद बनून उभा आहे. वाढवण बंदराच्या रुपाने मोदींनी भारताची सागरी ताकद जगाला दाखवली.
ठळक यश
१५० पेक्षा जास्त उपक्रम मेरिटाइम इंडिया व्हिजनअंतर्गत राबवले गेले.
अंतर्गत जलमार्गांची झेप : ३ वरून ३२, मालवाहतुकीत ७००% वाढ.
क्रूझ पर्यटनात वाढ, किनारी भागात रोजगार निर्मिती.
कांडला बंदरावर पहिला स्वदेशी ग्रीन हायड्रोजन प्रकल्प.