Join us

मुख्यमंत्र्यांचा दाओस दौरा अडचणीत; पंतप्रधानांचा मुंबई दौरा अन् लगेच भाजपची दिल्लीत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 07:26 IST

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबईत येत असून, त्या आधी १६ आणि १७ जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाओस दौरा अडचणीत आला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.

१६ ते २० जानेवारीदरम्यान दाओसला जागतिक आर्थिक परिषद होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जाणार आहे. मात्र पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारी रोजी मुंबईत येणार असल्याचे वृत्त धडकल्याने दाओसच्या परिषदेसाठी शिंदे, फडणवीस यांनी कोणत्या तारखांना जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. १६, १७ जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होणार आहे. फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर १९ तारखेच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यामुळे दाओसला नेमके जायचे कधी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

प्रशासन तारखांचा मेळ बसविण्यात मग्न

पंतप्रधानांचा दौरा, भाजपची बैठक या दोन्हींचा मेळ साधून शिंदे, फडणवीस यांच्या दाओस दौऱ्याच्या तारखा ठरविण्यात आता प्रशासन गुंतले आहे. दाओसमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी १ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार होतील, असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला होता.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी