महापालिका कर्मचारी असल्याचे भासवले; बोगस कर्मचाऱ्यांचा बँकेला ६३ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:25 IST2025-07-25T13:25:16+5:302025-07-25T13:25:41+5:30

महापालिका कर्मचारी असल्याचे भासवत चौघांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेतून कर्ज घेत त्याची परतफेड न करता ६२ लाख ८१ हजार ५३१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.

Pretending to be municipal employees; Bogus employees defraud bank of Rs 63 lakhs | महापालिका कर्मचारी असल्याचे भासवले; बोगस कर्मचाऱ्यांचा बँकेला ६३ लाखांचा गंडा

महापालिका कर्मचारी असल्याचे भासवले; बोगस कर्मचाऱ्यांचा बँकेला ६३ लाखांचा गंडा

मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे महापालिका कर्मचारी असल्याचे भासवत चौघांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेतून कर्ज घेत त्याची परतफेड न करता ६२ लाख ८१ हजार ५३१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी प्रफुल्लता चव्हाण, नरेश रामसिंग, अतुल तिवारी आणि कृष्णा तिवारी या चौघांविरोधात गुन्हा नोंदविला.

आयसीआयसीआय बँकेतील लोन रिलेशनशिप मॅनेजर देवेंद्र नायक यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. जून २०२३ मध्ये आरोपींनी महापालिका कर्मचारी असल्याचा दावा करत १५ लाखांच्या पर्सनल लोनसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. चौघांना एकूण ६३ लाखांचे कर्ज मंजूर केले. चारही आरोपींनी काही हप्ते भरले. मात्र, नंतर उर्वरित हप्ते थकविले.

आरोपी घरीही सापडले नाहीत, मोबाइलही बंद

बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराच्या पत्त्यावर भेट देत चौकशी केली असता ते तेथे सापडले नाहीत. त्यांचे मोबाइल क्रमांकही बंद असल्याने बँक अधिकाऱ्यांनी संबंधित पालिका कार्यालयांत जाऊन चौकशी केली.

त्यावेळी ते पालिका कर्मचारी नसल्याचेही उघड झाले. तेव्हा चौघांनी बनावट कागदपत्रांद्वारे ६२ लाख ८१ हजार ५३१ रुपयांचा गंडा घातल्याचे बँकेच्या निदर्शनास आले.

Web Title: Pretending to be municipal employees; Bogus employees defraud bank of Rs 63 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.