वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा: नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:46 IST2025-05-27T15:46:03+5:302025-05-27T15:46:47+5:30
मंत्रालयामध्ये वाढवण बंदरातील रोजगार आणि त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी बैठक संपन्न झाली.

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा: नितेश राणे
मुंबई: राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
मंत्रालयामध्ये वाढवण बंदरातील रोजगार आणि त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे (एनएसडीसी) सल्लागार डॉ ज्ञानेश्वर मुळे दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
लवकरच बंदर क्षेत्रामध्ये असलेल्या रोजगाराच्या संधींविषयी शिबीरांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणले की, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शिबीरांचे आयोजन करावे. या शिबीरांमध्ये वाढवण बंदराच्या ठिकाणी असणाऱ्या रोजगाराच्या संधी, यासाठी लागणारे प्रशिक्षण यांची माहिती द्यावी. वाढवण बंदराच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींविषयी एनएसडीसीने एक प्रशिक्षण कार्यक्रम लवकरात लवकर तयार करावा. त्यासाठी सध्या राज्यात उपलब्ध असलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या इमारती वापरता येतील का याचाही समावेश या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा. त्यामुळे जागेची अडचण दूर होऊन प्रशिक्षण कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करता येईल. त्यासाठी बंदर विभागाकडून लागणारी सर्वती मदत करण्यात येईल. वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचा फायदा राज्यातील तरुण–तरुणींना व्हावा यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखावा अशा सूचनाही मंत्री राणे यांनी केल्या.