Preity Rathi's death sentence is canceled by the High Court | प्रीती राठीच्या खुन्याची फाशी हायकोर्टाकडून अपिलात रद्द

प्रीती राठीच्या खुन्याची फाशी हायकोर्टाकडून अपिलात रद्द

मुंबई : सहा वर्षांपूर्वी नोकरीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या प्रीती राठी या तरुणीचा अंगावर अ‍ॅसिड फेकून खून केल्याबद्दल अंकुर पवार या आरोपीला सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम करण्यास नकार देऊन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी त्याला जन्मठेप ठोठावली.

महिलांवरील अत्याचाराचे खटले चालविणाऱ्या विशेष सत्र न्यायालयाने अंकुरला ९ सप्टेंबर २०१६ रोजी फाशी सुनावली होती. जीवघेण्या अ‍ॅसिडहल्ल्याच्या खटल्यात दिली गेलेली ती पहिलीच फाशी होती. याविरुद्ध अंकुरने केलेले अपील व फाशी कायम करण्याचे वैधानिक प्रकरण अशा दोन प्रकरणांवर २६ मार्चपासून एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने फाशी कायम न करण्याचा निकाल दिला. गुन्हे शाखेने सादर केलेले सर्व पुरावे ग्राह्य धरून प्रीतीचा खून अंकुरनेच केला हा सत्र न्यायालयाचा निष्कर्ष खंडपीठाने अपिलात कायम ठेवला. मात्र जीवघेणा अ‍ॅसिडहल्ला हा गुन्हा अमानुष असला तरी ज्यासाठी फक्त फाशी हीच शिक्षा अपरिहार्य ठरावी असा तो ‘विरळात विरळा’ नाही, असे खंडपीठाने म्हटले. सविस्तर निकालपत्र लगेच उपलब्ध न झाल्याने निकालाची सविस्तर कारणमीमांसा कळू शकली नाही.

प्रीती व अंकुर हे दोघेही दिल्लीतील नरेला भागात शेजारी राहायचे. अंकुरचे प्रीतीवर एकतर्फी प्रेम होते, पण तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. याचा सूड उगविण्यासाठीच अंकुरने प्रीतीवर अ‍ॅसिडहल्ला केला हे अभियोग पक्षाचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. आपल्याला या खटल्यात निष्कारण गोवण्यात आले. आधी पोलिसांनी रोहतक येथील एका तरुणाला अटक केली होती, पण ओळखपरेड न घेताच त्याला सोडून देण्यात आले. पोलिसांनी अ‍ॅसिड दिल्लीतूनच खरेदी केल्याचे कथित पुरावे पश्चातबुद्धीने नंतर गोळा केले यासह अंकुरने बचावासाठी मांडलेले मुद्दे अमान्य केले गेले.
प्रीतीला मुंबईत भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस अश्विनी’ इस्पितळात परिचारिका म्हणून नोकरी लागली होती. तेथे रुजू होण्यासाठी ती वडील, चुलते व आत्यासह गरीबरथ एक्स्प्रेसने दिल्लीहून आली. २ मे २०१३ रोजी ती वांद्रे टर्मिनसवर उतरली. अंकुर तिच्या पाळतीवरच होता व त्याच गाडीतून तोही दिल्लीहून आला होता. वांद्रे टर्मिनसला पोहोचताच गर्दीचा फायदा घेत तो तोंडावर बुरखा घालून प्रीतीच्या जवळ आला व त्याने बाटलीतील सल्फ्युरिक अ‍ॅसिड तिच्यावर फेकले. भीषण स्वरूपात भाजलेल्या प्रीतीचा नंतर एक महिन्याने १ जून रोजी मृत्यू झाला.

पूर्ण तयारीनिशी हल्ला केल्याचे सिद्ध
अ‍ॅसिडहल्ला अंकुरने पूर्ण तयारीने केला होता. त्यासाठी दिल्लीतच अ‍ॅसिड खरेदी करून ते रेल्वेत आपल्यासोबत घेऊन तो मुंबईपर्यंत आला. त्याने त्याच गाडीने प्रवास केला हे त्याच्या मोबाइल फोनच्या कॉल डेटाच्या रेकॉर्डवरून सिद्ध झाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Preity Rathi's death sentence is canceled by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.