Join us

राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:01 IST

राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेच आहे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. 

माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. 

राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आमदारांवर, संघटनेवर सरकारचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव किंवा त्यांना मदत नव्हती, त्यामुळे सरकार असूनही शिवसेना हतबल झाली होती. याची सर्वस्वी जबाबदारी नेतृत्वाची असते म्हणून राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना ही भाजपामुळे फुटली नाही. तर शिवसेना फुटण्याचे सर्व श्रेय हे उद्धव ठाकरेंना जाते, हे सत्य आणि योग्यच आहे, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये युतीसाठी दोनदा टाळी दिल्याच्या गोष्टींवर राज ठाकरेंना विचारले असता धक्कादायक वक्तव्य राज ठाकरेंनी केले. तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखा नाही. बाकीच्या लोकांचे वाईट वाटते. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहीत नाही, तेवढा मला माहीत आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबाबत आपले मत व्यक्त केले. 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपाप्रवीण दरेकर