Join us  

भाजपला मदत करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचे आरोप - राष्ट्रवादी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:24 PM

भाजपला मदत करण्यासाठी वारंवार दाऊदच्या शरणागतीची चर्चा समोर आणली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे

मुंबई  - भाजपला मदत करण्यासाठी वारंवार दाऊदच्या शरणागतीची चर्चा समोर आणली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊदला परत आणण्यास विरोध केल्याचे वक्तव्य केले. पवारांवरील आरोपाचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला. गेली २५ वर्षे दाऊदला का भारतात आणले नाही ही चर्चा करण्यात येत आहे. परंतु शरद पवार साहेबांनी आपली स्पष्ट भूमिका यावर मांडलेली आहे. जो आरोपी फरारी आहे अशा आरोपीला शर्तीवर सरेंडर केले जात नाही. त्यावेळी सरकारने मान्यता दिली नाही. ज्या अटी राम जेठमलानी सांगत होते. त्या सरकारला मान्य नव्हत्या. त्याबाबत शरद पवार यांनी वारंवार खुलासा केला आहे असेही नवाब मलिक म्हणाले. 

राम जेठमलानी जर सच्चे देशभक्त होते तर त्यांनी दाऊदला भेटल्यानंतर इंटरपोलला का माहिती दिली नाही. त्यानंतर राम जेठमलानी केंद्रीय मंत्री झाले. राज्यात भाजपचं सरकार आलं केंद्रात भाजपचं सरकार आहे.त्यावेळी दाऊदला सरेंडर करुन का घेतले नाही. त्यांनी या सरकारशी चर्चा का केली नाही असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

प्रकाश आंबेडकर हे २५ वर्षानंतर हा प्रश्न काढत आहेत. आता वंचित आघाडीच्या नेते बी. जी.कोळसेपाटील हे सांगत आहेत वेगळी निवडणूक लढणे म्हणजे भाजपला आणि आरएसएसला मदत करण्यासारखे आहे असे असताना प्रकाश आंबेडकर स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. आज जो प्रश्न निर्माण करण्यात आला. तो कुणासाठी, कुणाला मदत करण्यासाठी आहे असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

काही वर्षांपूर्वी स्वतः दाऊदने भारतात परत येण्याची इच्छा राम जेठमलानी यांच्याकडे व्यक्त केली होती. जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवारांना दिली होती. याबाबत तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांनी याबाबतची माहिती तत्कालीन पंतप्रधानांना दिली होती का? यंत्रणांना दिली होती का? किंवा दाऊदच्या समर्पणाचा निर्णय त्यांनी स्वतःच्या पातळीवर का नाकारला, याचे शरद पवारांनी उत्तर द्यावे असा आरोप प्रकाश आंबडेकरांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारदाऊद इब्राहिम