प्राजक्ता माळींच्या सन्मानाला कुठेही बाधा येऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीदरम्यान दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 07:28 IST2024-12-30T07:26:04+5:302024-12-30T07:28:06+5:30
भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्राजक्ता यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कारवाईबाबत आश्वस्त केले.

प्राजक्ता माळींच्या सन्मानाला कुठेही बाधा येऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीदरम्यान दिली ग्वाही
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्राजक्ता यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कारवाईबाबत आश्वस्त केले.
यूट्यूबवर काही लोक आपल्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार प्राजक्ता यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिले. माळी यांनी १५ ते २० मिनिटे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निवेदनही त्यांना दिले.
कराड याने बीडमध्ये इव्हेंटबाजी चालविली असून त्यात रश्मिका मंधाना, सपना चौधरी, प्राजक्ता माळी आदींचे इव्हेंट घडविले असे विधान आमदार धस यांनी केले होते.
‘धस यांना हे शोभत नाही’
या प्रकरणात अभिनेत्रीचे नाव जोडणे सुरेश धस यांना शोभत नाही. कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल, असे बोलता कामा नये, असे खडे बोल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धस यांना सुनावले आहेत.
राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. या प्रकरणी प्राजक्ता माळी यांनी केलेल्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणी महिलांविरोधातील अश्लील ट्रोलिंग रोखण्यासाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याचा इशारा महिला आयोगाने दिला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत रविवारी माहिती दिली असून त्या सविस्तर भूमिका सोमवारी मांडणार आहेत. गुन्ह्याचे स्वरुप, कोणती कलमे लावावी, इत्यादींबाबत पोलिसांना मार्गदर्शन करू, असेही त्यांनी सांगितले.
मराठी कलाकारांचा प्राजक्ता यांना पाठिंबा
- प्राजक्ता माळी यांच्या समर्थनार्थ अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. त्यात अभिनेत्री विशाखा सुभेदार, निर्माते सचिन मोटे, नितीन वैद्य, अभिनेता सुशांत शेलार, कुशल बद्रिके, इत्यादींचा समावेश आहे.
- कलाकार हा कलाकार असतो. त्याचे नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणे चुकीचे आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून, तिच्या भूमिकेचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया नृत्यांगना पाटील हिने नोंदविली आहे.