Prajakta Mali Meets Devendra Fadnavis: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त करत 'धस यांनी माफी मागावी', अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली होती. पण, सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिल्यानंतर प्राजक्ता माळीने रविवारी (२९ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
बीडमध्ये मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणाचे पडसाद उमटत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसह काही अभिनेत्रींची नावे घेत एक विधान केले. 'वीटभट्ट्या, जमीन बळकावून प्रचंड पैसा मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे (परळी) आणले जाते', असे धस म्हणाले होते.
त्यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना काही सवाल केले. त्याचबरोबर केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली.
सुरेश धस यांच्या विधानासंदर्भात प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानंतर रविवारी (२९ डिसेंबर) प्राजक्ता माळीने सागर या शासकीय बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुरेश धस यांनी केलेले विधान आणि त्यामुळे निर्माण वाद, याबद्दल प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
आमदार सुरेश धस यांना समज द्यावी. त्याचबरोबर सोशल मीडियावर विनाकारण ट्रोल केलं जात आहे, त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागण्यांचे निवेदन अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
तुमच्या सन्मानाला कुठेही बाधा येईल, असे कृत्य खपवून घेणार नाही. त्याचबरोबर चुकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्ता माळीला दिले.