Powai Hit and Run: मुंबईतील पवईमध्ये अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी संध्याकाळी पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरात एका भरधाव कारने चौघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, काही तासांच्या थरारानंतर आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मार्केट परिसरातील महात्मा फुले नगरजवळ हा अपघात झाला. नवी मुंबईतील खारघर येथील रहिवासी असलेला विकास दीप सिंधू (१९) हा आपली कार घेऊन वेगाने जात होता. जेव्हीएलआर मार्गावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने आधी एका बाईकला धडक दिली. त्यानंतर ही कार थेट रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांवर आदळली.
धडक इतकी भीषण होती की, पादचारी दूरवर फेकले गेले. अपघातानंतर मदतीसाठी थांबण्याऐवजी आरोपीने कार पळवून नेली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना मदत केली आणि पोलिसांना पाचारण केले. या अपघातात मनीषा सावंत, नाथा सोपान पारगावकर, अम्माचार पांडे,धनुष पांडे हे चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जखमींना सुरुवातीला टागोर नगरमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर तिघांना डिस्चार्ज देण्यात आला, मात्र मनीषा सावंत यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
तक्रार, अटक आणि जामीन
अपघातानंतर आरोपी विकास सिंधूने विक्रोळी पार्कसाईट पोलीस स्टेशन गाठून शरणागती पत्करली. जमावाच्या रागाला घाबरून आपण पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पवई पोलिसांनी विकास विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम २८१ आणि १३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मद्यपान केले होते का?
आरोपी हा एक विद्यार्थी असून तो ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार आहे का, याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्याचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच तो नशेत होता की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान, जेव्हीएलआर सारख्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Web Summary : In Powai, a speeding car injured four pedestrians, including one seriously. The 19-year-old driver surrendered, was arrested, and quickly granted bail. Police are investigating if he was driving under the influence.
Web Summary : पवई में एक तेज रफ्तार कार ने चार राहगीरों को टक्कर मार दी, जिनमें एक गंभीर रूप से घायल हो गया। उन्नीस वर्षीय चालक ने आत्मसमर्पण कर दिया, उसे गिरफ्तार किया गया और तुरंत जमानत मिल गई। पुलिस जांच कर रही है कि क्या वह नशे में गाड़ी चला रहा था।