लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असला तरी मुंबई-गोवा महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यांतच आहे. प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केला असून, हा महामार्ग वेळेत दुरुस्त झाला नाही तर गणेशोत्सवाला चाकरमानी वेळेत पोहोचतील की नाही? हा प्रश्न अनुरितच आहे. दरम्यान, गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मोठ्या संख्येने शनिवारी रात्रीच गावाकडे निघणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने सांगितले की, कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सरकारला जाब विचारत आहोत. मात्र, रस्ता आहे, तसा आहे. प्रत्येक वर्षीच्या गणेशोत्सवात खड्ड्यांचे ‘विघ्न’ पार करत गणेशभक्तांना कोकणातील आपले गाव गाठावे लागते. यंदा अवघे चार ते पाच दिवस गणेशोत्सवासाठी शिल्लक आहेत. मात्र, रस्त्याची डागडुजी झालेली नाही. कशेडी बोगद्याच्या अगोदर रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे चाकरमानी कोकणात पोहोचेल की नाही? हा प्रश्न आहे. गडब येथेही हीच अवस्था आहे. बहुतांशी चाकरमानी शनिवारी रात्री कोकणात जाण्यासाठी निघणार आहेत.
जनआक्रोश समितीचा सवाल तरी काय?
- महामार्गाचे अपूर्ण टप्पे तातडीने पूर्ण करण्याचे ठोस आराखडे कोणते?
- काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि नेत्यांवर विलंबाबद्दल जबाबदारी निश्चित करण्यात आली का?
- प्रत्येक टप्प्याचे पारदर्शक वेळापत्रक कधी जाहीर होणार?
काय आहेत मागण्या?
- जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- वार्षिक नव्हे, मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा.
- अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना भरपाई जाहीर करावी.