Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हे तर 'स्थगिती सरकार', विकासाच्या बाबतीत अन्याय सहन नाही करणार' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 15:10 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेमधून नव्या सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारवर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. हे सरकार स्थगिती सरकार आहे, असेही राणे म्हणाले. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेमधून नव्या सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फारकाळ टिकणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ स्वार्थापोटी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आहे. यावेळी गेल्या काही दिवसांत सरकारने विविध विकासकामांना दिलेल्या स्थगितीवरूनही  नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली. 

''सरकारकडून विविध विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. सत्ता बदलल्यानंतर कोकणातील विविध विकासकामे ही ठप्प झाली आहेत. त्यामुळे या सरकारचे स्थगिती सरकार असे नामकरण करता येईल,'' असा टोला राणेंनी लगावला. महाविकास आघाडीचं सरकार हे विकास करण्यासाठी अस्तित्वात आले नसून काम बंद करण्यासाठीच आलं आहे. ठेकेदाराला बोलावून त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठीच हे सर्व चाललंय, असा आरोपही नारायण राणेंनी केला. हे तिन्ही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, शेतकरी, कामगार किंवा उद्योजकांसाठी हे सरकार एकत्र आले नाही, असेही ते म्हणाले. आम्ही 15 ते 18 डिसेंबर दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावदौरे करुन लोकांना भाजपा सरकार का स्थापन करु शकलं नाही, तसेच तीन पक्षांचं सरकार लोकांना पोषक नसून घातक कसं आहे, हे सांगणार आहोत. विकासाच्या बाबतीत कुठलाही अन्याय सहन करणार नाही, असे राणेंनी म्हटले आहे.   

दरम्यान, जिल्ह्यात आढावा बैठका घेणार खासदार विनायक राऊत यांच्यावरही राणेंनी जोरदार टीका केली. शिवसेना आता सत्तेत नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी कोणत्या अधिकारांमध्ये जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. सत्तारुढ पक्षाचे खासदार नसताना त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकारात आदेश दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच बेकायदेशीर बैठका घेऊन शिवसेनेकडून काम करत असल्याचा भास निर्माण केला जात आहे, असेही राणे म्हणाले.  

टॅग्स :नारायण राणे सिंधुदुर्गउद्धव ठाकरेशिवसेना