Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग आपल्या दारी’ला स्थगिती! उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:13 IST

Uday Samant : राज्यात पुन्हा वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जळगाव, अमरावती, औरंगाबाद विद्यापीठाच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

मुंबई : विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांचे प्रश्न विविधस्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवता यावेत म्हणून ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील उपक्रमांनंतर तब्बल एका महिन्यासाठी या उपक्रमाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली.राज्यात पुन्हा वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जळगाव, अमरावती, औरंगाबाद विद्यापीठाच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचा दौरा केल्यानंतर विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या अडचणींसाठी सर्वांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयात जावे लागते. विशेषतः या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट देऊनही विषय प्रलंबित असतात आणि यात वेळ जातो, नाहक पैसे खर्च हाेतात. हे लक्षात आल्यामुळे ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला.प्रधान सचिव, आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, संचालक उच्च शिक्षण, संचालक कला संचालनालय, संचालक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, संचालक ग्रंथालय संचालनालय, सहसंचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी हाेतात.

‘मुंबईत हाेणाऱ्या कार्यक्रमावेळी सुरक्षेची काळजी नाही का?’- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीच्या धास्तीने अद्याप मुंबईत महाविद्यालये, शाळा सुरू करण्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही. इतकेच नाही तर लोकल सेवाही निमयांच्या चाैकटीतच सुरू करण्यात आली आहे.  असे असताना २२ फेब्रुवारीच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ मुंबईच्या या कार्यक्रमात मात्र एसएनडीटी महिला विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पालक यावेत यासाठी नियोजन करण्यात येत आहे.  अशावेळी शासनाला आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कोरोनाची, विद्यार्थी, प्राचार्य, अधिकारी यांच्या सुरक्षिततेची काळजी नाही का ? असा सवाल सिनेट सदस्य व मुक्ता संघटनेचे वैभव नरवडे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :उदय सामंतशिक्षण