Join us

भाजपाला दणका; मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:01 IST

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसचे रवी राजा यांची विरोधी पक्षनेते पदी केलेल्या नियुक्तीला जूनमध्ये शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. भाजपची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मुंबई : राज्यात सत्तेचे गणित बदलल्यावर भाजपने मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी काँग्रेसचे रवी राजा यांच्याऐवजी आपली विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करावी, अशी मागणी केलेली याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. न्या. एस. जे. काथावाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिंदे यांच्या याचिकेवर निकालदिला.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसचे रवी राजा यांची विरोधी पक्षनेते पदी केलेल्या नियुक्तीला जूनमध्ये शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. केवळ विरोधी पक्षनेत्याचा चेहरा बदलण्यासाठी किंवा हृदयपरिवर्तन झाले म्हणून किंवा संख्याबळ जास्त असल्याने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नियुक्त केलेल्या विरोधी पक्षनेत्याला त्याच्या पदावरून हटवू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. महापौरांनी घेतलेला निर्णय न्यायपूर्ण आणि योग्य आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

शिंदे यांनी केलेल्या याचिकेनुसार, २०१७च्या पालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेऊन सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केली नाही व विरोधी पक्षनेते पदही स्वीकारले नाही. त्यामुळे हे पद काँग्रेसला गेले. त्यावर आता हृदयपरिवर्तन झाल्याने २०२० मध्ये विरोधी पक्षनेते पद भाजप मागू शकत नाही, असे रवी राजा यांच्या वतीने जोएल कार्लोस यांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :भाजपाशिवसेनाकाँग्रेसउच्च न्यायालयमुंबई महानगरपालिका