भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:58 IST2025-05-06T06:58:25+5:302025-05-06T06:58:36+5:30
पक्ष निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख नेते, कायर्कर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी यांची मते जाणून घेतली.

भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संघटनात्मकदृष्ट्या असलेल्या भाजपच्या ७८ जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष कोण असतील याबाबतचा चेंडू आता प्रदेश भाजपच्या कोर्टात गेला आहे. येत्या आठवडाभरात नावे जाहीर होतील अशी शक्यता आहे. प्रदेश भाजपने प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक पाठवून तीन-तीन नावे मागविली होती. सर्वच निरीक्षकांनी ही नावे लिफाफाबंद करून प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविली आहेत.
पक्ष निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख नेते, कायर्कर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. ‘तुम्हाला कोण जिल्हाध्यक्ष म्हणून हवा आहे आणि का हवा आहे?’ अशी विचारणा करत प्रत्येकाचे मत जाणून घेतले. राज्यभरात झालेल्या अशा बैठकांमध्ये कुठेही गोंधळ वा वाद झाला नाही, असे प्रदेश भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
जिल्हाध्यक्षांची नावे अंतिम करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची बैठक लवकरच मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला जिल्हाध्यक्षांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हाध्यक्ष पद निवडीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षांतर्गत राजकारण ढवळून निघाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
वयाची अट अशी...
मंडळ/तालुकाध्यक्षांच्या नियुक्ती अलिकडेच करण्यात आल्या. ३५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींनाच हे पद द्यावे असे पक्षनेतृत्वाचे आदेश होते. त्यानुसार नियुक्ती करण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्षांचे वय ४५ ते ६० वर्षांदरम्यानच असावे, असे आदेश आहेत.
शासकीय नियुक्त्या जूनअखेरपर्यंत
जिल्हाध्यक्षांची नियुक्ती झाली की शासकीय नियुक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहेत. एसईओंपासून जिल्हा व राज्य पातळीवरील विविध समित्या, महामंडळांचे अध्यक्ष आणि संचालक यांची तीन पक्षांमध्ये वाटणी कशी असावी याचे सूत्र राज्यस्तराऐवजी जिल्हास्तरावर निश्चित करण्यात येईल. कोणती पदे महायुतीतील कोणत्या पक्षाकडे हे निश्चित झाले की मग तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील नावे देतील आणि मग नियुक्तीचे आदेश निघतील. ही संपूर्ण प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.