Join us

हवेचं वाजलं दिवाळं...; फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण पातळी वाईट स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 07:05 IST

लक्ष्मी पूजनाला मुंबईकरांना रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी केली होती.

मुंबई : दिवाळीपूर्वी पडलेल्या पावसामुळे मुंबईची हवा समाधानकारक नोंदविण्यात आली होती. मात्र दिवाळीत सगळ्याच नियमांना बगल देत वाजविण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुरांनी मुंबईला पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात ओढले आहे. भाऊबिजेच्या दिवशी मुंबईत ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी वाईट नोंदविण्यात आली असून, यात प्रकाश प्रदूषणानेही भर घातली आहे.

लक्ष्मी पूजनाला मुंबईकरांना रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी केली होती. त्यामुळे सोमवारी मुंबईवर प्रदूषणाचे ढग जमा झाले होते. वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणानेही यात भर घातली होती. पाडव्याला फटाके वाजविण्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी भाऊबीजेला नोंदविण्यात आलेली हवा वाईट या श्रेणीत आहेत. दरम्यान, भाऊबिजेला रात्री उशिरापर्यंत वाजविण्यात येणा-या फटक्यांमुळे गुरुवारी मुंबईच्या प्रदूषणात आणखी भरच पडणार आहे.

प्रकाश प्रदूषण

ध्वनी आणि वायू प्रदूषणाने कहर केला असतानाच दुसरीकडे मध्य मुंबईत म्हणजे वरळी, लोअर परेल परिसरात गगनचुंबी इमारतींवर मोठमोठे प्रकाशझोत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. रात्रभर वेगाने आकाशात फिरणारे हे प्रकाशझोत डोळ्यांना तात्पुरते नेत्रदीपक भासत असले तरी हे एक प्रकारचे प्रकाश प्रदूषण असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले.

लक्ष्मीपूजनच्या तुलनेत पाडव्याला मात्र फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होते. लक्ष्मीपूजनाला रात्री ७ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंत आतिषबाजी करणारे आणि कानठाळ्या बसविणारे सुतळी बॉम्ब मोठ्या प्रमाणावर वाजविण्यात आले. तर पाडव्याला रात्री ७ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत बहुतांशी ठिकाणी फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होते

टॅग्स :प्रदूषणफटाकेमुंबई