विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ घालविलेली जागाच प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 04:34 IST2020-01-30T04:33:35+5:302020-01-30T04:34:04+5:30
वातावरणातील प्रदूषणामुळे या फुप्फुसांचा रंग काळा झाला आहे. जेव्हा ही फुप्फुसे बसविण्यात आली, तेव्हा यांचा रंग पांढरा होता.

विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ घालविलेली जागाच प्रदूषित
मुंबई : आम्हाला कधीच कळले नाही की, आम्ही जेथे जास्तीतजास्त वेळ घालविला आहे, त्या जागेवर इतके प्रदूषण आहे, अशी प्रतिक्रिया वांद्रे येथील चार महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी दिली. मुंबईच्या हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी वांद्रे येथील नॅशनल कॉलेजच्या परिसरात दोन आठवड्यांपूर्वी कृत्रिम फुप्फुसे बसविण्यात आली होती. वातावरणातील प्रदूषणामुळे या फुप्फुसांचा रंग काळा झाला आहे. जेव्हा ही फुप्फुसे बसविण्यात आली, तेव्हा यांचा रंग पांढरा होता.
जानेवारीच्या सुरुवातीस वांद्रे पश्चिम येथे हवा प्रदूषण-जागरूकता मोहीम राबविण्यात आली होती. त्याचाच भाग म्हणून वांद्रे येथे हा प्रयोग करण्यात आला. वाढते प्रदूषण ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर वायुप्रदूषणावर काम करत असलेल्या संस्थांनी मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे योग्य पावले उचलण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. २०१८ साली अशाच प्रकारे दिल्ली आणि बंगळुरू येथे कृत्रिम फुप्फुसे बसविण्यात आली होती. दिल्लीमध्ये अवघ्या ६ दिवसांत तर बंगळुरूमध्ये २५ दिवसांत या कृत्रिम फुप्फुसांचा रंग काळा पडला होता. महाराष्ट्रात वांद्रे येथे हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला. या माध्यमातून वायुप्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला, अशी माहिती झटका आॅर्ग आणि वातावरण फाउंडेशनकडून देण्यात आली.
३१ जानेवारी रोजी प्रदूषित झालेल्या कृत्रिम फुप्फुसांचे छोटे-छोटे तुकडे करण्यात येतील. ते तुकडे निर्णायक सरकारी समितीकडे पाठविले जातील आणि मुंबईदेखील दिल्लीसारखीच प्रदूषित आहे, हे याद्वारे निदर्शनास येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरे यांच्यासारखे पर्यावरणमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. त्यांनी मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. क्लीन एअर कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून आम्हाला मुंबईची क्लीन एअर योजना अधिक प्रभावी करायची आहे. त्यासाठी राजकीय नेते, सरकारी अधिकारी व इतर अधिकारी वर्गासोबत काम करायचे आहे, असे वातावरण संस्थेचे संस्थापक भगवान केशभट यांनी सांगितले.
मी आणि माझ्या मित्रांनी फुप्फुसाच्या बदलत्या रंगाबद्दल, तसेच हवेच्या गुणवत्तेच्या माहितीचा तपशील घेतला होता. नवव्या दिवसाच्या सुमारास फुप्फुसाचा रंग वाईटरीत्या बदलला होता. पहिल्या आणि नवव्या दिवशी काढलेले फोटो माझ्याकडे असल्याने, मी माझ्या अनेक मित्र आणि नातेवाइकांना पाठविले आणि सर्वांनाच धक्का बसला, असे वांद्रे येथील आर.डी. नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी नुसरत काझी हिने सांगितले.
जेव्हा मी ही कृत्रिम फुप्फुसे पाहिली, तेव्हा मी संस्थेच्या लोकांना सांगितले की, ही माझ्या फुप्फुसासारखी आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून माझ्या आणि इतर मुंबईकरांच्या फुप्फुसाचे काय होत आहे, हे मला आता पाहण्यास मिळते आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रदूषित हवेचे श्वसन करते, तेव्हा शरीरात काय बदल घडतात, हे दर्शविण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
- डॉ. संजीव मेहता.