वर्षाचे १५० दिवस प्रदूषित, मोकळा श्वास घेणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:45 IST2026-01-08T10:45:24+5:302026-01-08T10:45:24+5:30
...तरीही कुणीच नेता, उमेदवार प्रदूषणाच्या मुद्द्यावर तोंड उघडेना

वर्षाचे १५० दिवस प्रदूषित, मोकळा श्वास घेणार कधी?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या चार वर्षांत प्रत्येक वर्षी मुंबईकरांना केवळ दीडशे ते दोनशे दिवसच स्वच्छ हवा मिळाली . उर्वरित दिवस मात्र प्रदूषित हवेतच श्वास घ्यावा लागला आहे. त्यामुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. असे असतानाही कुणीच नेता मुंबई पालिका निवडणूक प्रचारात प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना दिसत नसल्याने मुंबईकरांकडून संताप व्यक्त होत आहे.
कोविड काळात म्हणजेच २०२० व २०२१ मध्ये लॉकडाऊनमुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबईमध्ये बऱ्यापैकी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक होता. मात्र, २०२२ ते २०२५ या चार वर्षांत मात्र प्रदूषण वाढले. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक प्रदूषकांमध्ये वाहनातून निघणारा धूर, कारखान्यातून निघणारा व कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारा धूर, बांधकामाची धूळ आणि इतर प्रदूषित घटकांमुळे मध्यम आणि वाईट नोंदवला जात असल्याचे वारंवार उघड झाले आहे.
मध्यम हवाही वाईटच
कित्येक महिन्यांपासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम नोंदविला जात आहे. मात्र, अशी हवादेखील मुंबईकरांना श्वास घेण्यासाठी धोकादायकच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत हवेचा दर्जा मध्यम नोंदवला जातो. मात्र, यंदा इमारतींची, रस्त्यांची बांधकामे, वाहतूककोंडी आणि कारखान्यांतील धूर यांमुळे हवेचा दर्जा घसरला. मात्र, जानेवारीच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे हवा मध्यम म्हणून नोंदवली गेली.
पावसाळ्यात प्रदूषके हवेत राहत नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना समाधानकारक किंवा चांगली हवा मिळते. हिवाळा आणि उन्हाळ्यात मात्र प्रदूषणात वाढ होते. मुंबई बेट असून, शहरावर समुद्राहून वाहणारे वारे वेगाने वाहत असतात. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत प्रदूषके वाहून जातात. त्यामुळे प्रदूषणाचा सामना सहसा करावा लागत नाही; परंतु असे फार क्वचित निदर्शनास येते. प्रदूषण करणाऱ्या घटकांना आवर घातला तर मुंबई नक्कीच प्रदूषणमुक्त होईल. - सुनील दहिया, विश्लेषक, एन्व्हायरोकॅटलिस्ट